French Open : रॉजर फेडररची विजयी सलामी; दुसऱ्या फेरीत चिलीचचे आव्हान

French Open : रॉजर फेडररची विजयी सलामी; दुसऱ्या फेरीत चिलीचचे आव्हान

रॉजर फेडररची विजयी सलामी

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने टेनिस कोर्टवर विजयी पुनरागमन केले. त्याला फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजयी सलामी देण्यात यश आले. पहिल्या फेरीच्या सामन्यात फेडररने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनचा ६-२, ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. फेडरर आणि इस्टोमिन यांच्यात आतापर्यंत आठ सामने झाले असून आठही सामने फेडररनेच जिंकले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सामन्यात फेडररपुढे क्रोएशियाच्या मरीन चिलीचचे आव्हान असणार आहे. चिलीचने पहिल्या फेरीत फ्रांसच्या आर्थर रिंडेर्कनेचवर ७-६ (८-६), ६-१, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली.

यावर्षी केवळ चौथा सामना

फेडररने २००९ मध्ये फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते. परंतु, २०१५ नंतर या स्पर्धेत खेळण्याची ही त्याची केवळ दुसरी वेळ आहे. तसेच त्याने मागील वर्षी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी हा त्याचा केवळ चौथा सामना होता. परंतु, या सामन्यात त्याने सहजपणे विजय मिळवला. त्याने डेनिस इस्टोमिनचा ६-२, ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

त्सीत्सीपास दुसऱ्या फेरीत 

ग्रीसच्या पाचव्या सीडेड स्टेफानोस त्सीत्सीपासनेही फ्रेंच ओपनची विजयी सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीच्या सामन्यात फ्रांसच्या जेरेमी चार्डीचा ७-६, ६-३, ६-१ असा पराभव केला. या सामन्यात त्सीत्सीपासने चार्डीची सर्व्हिस पाच वेळा मोडली. तसेच इटलीच्या यानिक सिनेरलाही स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यात यश आले. ऑस्ट्रियाच्या चौथ्या सीडेड डॉमिनिक थीमला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला स्पेनच्या पाब्लो अँजूरने ६-४, ७-५, ३-६, ४-६, ४-६ असे पराभूत केले.

First Published on: May 31, 2021 11:00 PM
Exit mobile version