शमी इतका फिट कधीच नव्हता !

शमी इतका फिट कधीच नव्हता !

कर्णधार कोहलीची कबुली

भारताने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना जिंकत ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या सामन्यात ३ विकेट घेणार्‍या मोहम्मद शमीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. शमीला मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आले नव्हते. तसेच त्याच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. मागील वर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी तो ’यो-यो’ चाचणीत पास होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. मग त्याने आपल्या फिटनेस आणि खेळावर मेहनत घेत संघात पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर शमी इतका फिट कधीच नव्हता, असे म्हणत कर्णधार विराट कोहलीने त्याचे कौतुक केले.

आमचे वेगवान गोलंदाज मिळून कोणत्याही संघाला अडचणीत टाकू शकतात. आता शमीनेही त्याच्या खेळात आणि फिटनेसमध्ये सुधारणा केली आहे. तो याआधी इतका फिट कधीच नव्हता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आता तेच तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही करतो आहे, असे कोहली म्हणाला.

तसेच या सामन्यात एकूण ७ विकेट घेणार्‍या फिरकीपटू कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि केदार जाधव यांचेही कोहलीने कौतुक केले. उत्तरार्धात खेळपट्टी खूपच हळू झाली होती. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान खेळपट्टी चांगली होती. त्या खेळपट्टीवर आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. हे मैदान छोटे असतानाही त्यांनी बिंदासपणे गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यास प्रवृत्त केले, असे कोहलीने सांगितले.

कोहलीला विश्रांती

भारताचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ एकदिवसीय आणि ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याने मागील काही महिन्यांत खूप सामने खेळले असल्याने भारतात होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला पुरेशी विश्रांती मिळावी यादृष्टीने बीसीसीआय, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

First Published on: January 24, 2019 4:56 AM
Exit mobile version