Fuzhou China Open : सिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

Fuzhou China Open : सिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

सिंधू आणि श्रीकांत चीन ओपन मधून बाहेर

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना चीन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सिंधूचा चीनच्या हि बिन्गजिओने तर श्रीकांतचा चीनी ताईपेच्या चोऊ टीन चेन याने पराभव केला.

बिन्गजिओ-सिंधूमध्ये चुरशीची लढत

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सिंधूचा बिन्गजिओने १७-२१, २१-१७, १५-२१ असा पराभव केला. या सामन्याचा पहिला सेट १७-२१ असा गमावल्यानंतर सिंधूने दुसरा सेट २१-१७ असा जिंकला. तिसऱ्या सेटची सुरुवात सिंधूसाठी चांगली झाली नाही. या सेटच्या मध्यंतरापर्यंत बिन्गजिओकडे ११-६ अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने चांगले पुनरागमन करत बिन्गजिओची आघाडी १५-१६ अशी कमी केली. पण बिन्गजिओने आक्रमक खेळ करत पुढचे सलग ५ गुण मिळवत हा सेट २१-१५ असा जिंकत हा सामनाही जिंकला.

श्रीकांत सरळ सेटमध्ये पराभूत

दुसरीकडे पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत किदाम्बी श्रीकांतचा तिसऱ्या सीडेड चोऊ टीन चेन १४-२१, १४-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटची सुरुवात दोन्ही खेळाडूंनी चांगली केली. त्यामुळे या सेटच्या मध्यंतरापर्यंत चेनकडे ११-१० अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. पण नंतर चेनने अधिक चांगला खेळ करत हा सेट २१-१४ असा जिंकला. तर या सामन्याचा दुसरा सेट पहिल्या सेटप्रमाणेच झाला. या सेटच्या मध्यंतराला चेनकडे ११-८ अशी तीनच गुणांची आघाडी होती. पण चेनने आपला खेळ उंचावत हा सेट २१-१४ असा जिंकत हा सामनाही जिंकला.
First Published on: November 9, 2018 10:34 PM
Exit mobile version