प्रथम फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारल्याचा आनंद!

प्रथम फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारल्याचा आनंद!

विराट कोहलीचे उद्गार

विराट कोहलीच्या भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ६७ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २४० धावांचा डोंगर उभारला. भारताकडून लोकेश राहुल (९१), रोहित शर्मा (७१) आणि कर्णधार कोहली (नाबाद ७०) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना भारताला बरेच यश मिळाले आहे. मात्र, प्रथम फलंदाजी करताना त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात आणि धावा रोखण्यात वारंवार अपयश येत आहे. परंतु, विंडीजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारून सामना जिंकल्याचा कोहलीला आनंद होता.

प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याबाबत आम्ही बरीच चर्चा केली आहे. मात्र, चर्चा करणे, योजना आखणे ही एक गोष्ट आणि योजनेप्रमाणे खेळणे ही दुसरी गोष्ट. राहुल आणि रोहित या सामन्यात ज्याप्रकारे खेळले, ते वाखाणण्याजोगे होते. याआधी प्रथम फलंदाजी करताना आमचे फलंदाज फटकेबाजी करायची की नाही याचा खूप विचार करायचे. मात्र, यात आता बदल झाला आहे, असे कोहली म्हणाला.

कोहलीने या सामन्यात अवघ्या २९ चेंडूत ७० धावांची खेळी केली, ज्यात तब्बल ७ षटकारांचा समावेश होता. या आक्रमक खेळीविषयी त्याने सांगितले, मला या सामन्यात काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली. मी राहुलला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकण्यास सांगितले आणि मी फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला. मी आता आक्रमकपणेही खेळण्याचा प्रयत्न करत आहे.

First Published on: December 13, 2019 5:06 AM
Exit mobile version