हार्ड लक!

हार्ड लक!

CRICKET-WC-2019-ENG-SRI

कुठल्याही सामन्यात मोठी खेळी करण्यापेक्षा विजयी खेळीला महत्त्व दिले जाते. अनेकदा शतकी, अर्धशतकी किंवा जलद खेळी करूनदेखील फलंदाजांना आपल्या संघाचा विजय मिळवून देण्यात अपयश येते. बर्‍याच सामन्यांत तर शतकवीरांनाही सामना शेवटपर्यंत लढवून त्याचे विजयात रूपांतर करता येत नाही, अशी उदाहरणे आहेत. यंदाच्या विश्वचषकात असेही काही सामने झाले आहेत, ज्यात आव्हानाचा पाठलाग करताना काही फलंदाजांनी अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र, विजयाच्या समीप येताच ते बाद झाल्याने आशेवर पाणी फेरले गेले. अखेर त्यांच्या कामगिरीचे चीज न झाल्याने केवळ ‘हार्ड लक’ म्हणण्याची वेळ आली.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ‘चोकर्स’ दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी वॅन डर डूसेनने अर्धशतकी खेळी करत धावसंख्येचा पाठलाग योग्यरीत्या सुरू ठेवला होता. मात्र, तो बाद होताच आफ्रिकेच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरले गेले. याउलट ऑस्ट्रेलियाने अफगाणविरुद्धच्या सामन्यात 208 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. वॉर्नरने एक बाजू लावून धरत 89 धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. द.आफ्रिकेच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती झाली. 331 धावांचा पाठलाग करताना डूसेन आणि जेपी ड्युमिनी यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, डूसेन बाद झाल्यानंतर आफ्रिकन पिछाडीवर पडले. यानंतर अखेरपर्यंत ड्युमिनीने एकट्याने झुंज दिली, परंतु तो बाद होताच आफ्रिकेच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तान-इंग्लंडच्या हाय व्होल्टेज सामन्यातही पाकिस्तानने उभारलेल्या 348 धावांचा डोंगर पार करताना प्रबळ दावेदार इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. जो रूट आणि जॉस बटलर यांच्या शतकी खेळी वाया गेल्या.

न्यूझीलंड-बांगलादेश सामन्यात रॉस टेलरने 80 धावांची खेळी केली. मात्र, विजयाच्या समीप पोहोचत असतानाच त्याचा बळी गेल्याने विजय खडतर झाला होता. अखेरच्या टप्प्यात सँटनरने किल्ला लढवत विजय निश्चित केल्याने टेलरची ही खेळी व्यर्थ होण्यापासून बचावली. ऑस्ट्रेलिया-विंडीज सामन्यात विंडीजच्या शाई होप आणि जेसन होल्डरने अर्धशतकी खेळी करत विजयापर्यंत संघाला पोहोचवले. मात्र, अखेरच्या टप्प्यात ते बाद झाल्याने अवघ्या 15 धावांनी संघाला पराभूत व्हावे लागले. कांगारूंविरुद्ध खेळताना बांगला टायगर्सच्या मुशफिकूर रहिमने शतकी खेळी केली.

मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला आणि त्याचीही ही मोठी खेळी पाण्यात गेली. श्रीलंकेविरुद्ध यजमान इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 80 धावांची नाबाद खेळी करूनही विजय मिळवून देण्यात अपयश आले होते. भारताविरुद्ध अफगाणच्या मोहम्मद नबीने सामना जवळपास खिशातच घातला होता. मात्र, अखेरच्या षटकात शमीने त्याचा अडथळा दूर केल्याने अफगाण पराभूत झाला. न्यूझीलंडच्या 291 धावांचा पाठलाग करणार्‍या विंडीजचीही स्थिती चोकर्सप्रमाणेच झाली. केवळ पाच धावांनी पराभूत झालेल्या वेस्ट इंडिजकडून ख्रिस गेल (87) आणि कार्लोस ब्रेथवेट (101) यांच्या मोठ्या खेळी अपयशी ठरल्या.

एकूणच सामन्यात फलंदाजांनी किती धावांचे योगदान दिले, याहीपेक्षा महत्त्वाचे ठरते ते त्या फलंदाजाने दिलेले विजयी योगदान. ज्या फलंदाजांना आपल्या खेळीचे संघाच्या विजयात रूपांतर करण्यात यश आले, त्यांच्या संघांची वाटचाल उपांत्य फेरीकडे होताना दिसून येत आहे.

हे ठरले बेस्ट फिनिशर्स
भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात 228 धावांचा पाठलाग करताना भारताच्या रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्याला महेंद्रसिंग धोनीने साथ दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही असेच काहीसे चित्र बघावयास मिळाले. 213 धावांचा पाठलाग करताना जो रूटने सुरेख शतकी खेळी केली. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याने अखेरपर्यंत फलंदाजी करत विजय निश्चित केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या शाकिब (124)आणि लिटन दासनेही (94) अखेरपर्यंत किल्ला लढवत सामन्याचा विजयी निकाल लावला. द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने नाबाद शतकी खेळी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

First Published on: June 24, 2019 4:48 AM
Exit mobile version