आमच्या संघात विश्वविजेते होण्याची धमक – हरमनप्रीत

आमच्या संघात विश्वविजेते होण्याची धमक – हरमनप्रीत

आमच्या संघात विश्वविजेते होण्याची धमक - हरमनप्रीत

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपला येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघ कर्णधार हरमनप्रीत म्हणाली की, ‘मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासारख्या भारताच्या दिग्गज खेळाडूंची कमतरता टी- २० संघाला जाणवत आहे. मितालीने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ही पोकळी भरून काढणं कोणालाही शक्य नाही. असं असलं तरीही आमच्या संघात विश्वविजेते होण्याची धमक आहे’, असा विश्वास भारतीय महिला संघ कर्णधार हरमनप्रीतने व्यक्त केला आहे.

भारताच्या सध्याच्या संघाचं सरासरी वय हे २२.८ वर्षे असून आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या अनुभवाचा विचार केल्यास हरमनप्रीत संघातील सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे. सोमवारी सिडनीतील तारोंगा प्राणीसंग्रहालयात पार पडलेल्या कार्यक्रमात टी – २० वर्ल्डकपच्या ट्रॉफीचे अनावरण झाले. यावेळी बोलताना ती म्हणाली की, ‘मी दोन वर्षांपूर्वी भारतीय संघातील सगळ्यात तरुण खेळाडू होते, आता या नव्या मुलींमध्ये मी अनुभवी आहे. असे असले तरीही संघातील इतर खेळाडू मुली देखील एखाद्या अनुभवी खेळाडू प्रमाणेच खेळतात असे तिने सांगितले आहे.

इंग्लंडकडून जरी २०१७ मध्ये भारताला नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला तरीही, यावेळी संघाने प्रत्येक बाबीमध्ये सुधारणा केली असल्याचे हरमनप्रीतने सांगितले. ‘ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यांचा विचार करण्यापेक्षा यावेळी आम्ही सकारात्मक खेळण्यावर भर दिल्याचे’ देखील ती म्हणाली आहे. सिडनीत पार पडलेल्या कार्यक्रमात वर्ल्डकपच्या ट्रॉफीचे अनावरण करताना, स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या संघाच्या कर्णधार उपस्थित होत्या.

First Published on: February 18, 2020 5:48 PM
Exit mobile version