साडे सहा तास, २७८ चेंडू आणि ३७ धावा; हाशिम आमलाच्या फलंदाजीची ट्विटरवर चर्चा

साडे सहा तास, २७८ चेंडू आणि ३७ धावा; हाशिम आमलाच्या फलंदाजीची ट्विटरवर चर्चा

हाशिम आमलाच्या फलंदाजीची ट्विटरवर चर्चा

हाशिम आमलाची दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. आमलाने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. परंतु, तो अजूनही स्थानिक क्रिकेट खेळत आहे. त्याने इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून खेळताना उत्कृष्ट खेळी केली. साऊथहॅम्पटन येथे झालेल्या सामन्यात हॅम्पशायर संघाने पहिल्या डावात ४८८ धावांची मजल मारली होती. याचे उत्तर देताना सरेचा पहिला डाव अवघ्या ७२ धावांत आटोपल्याने त्यांना फॉलोऑन मिळाला. सरेचा संघ दुसऱ्या डावातही अडचणीत सापडला होता. ते हा सामना गमावणार असेच वाटत होते. परंतु, आमलामुळे सरेचा पराभव टळला. सरेची सामन्याअंती ८ बाद १२२ अशी धावसंख्या होती.

आमलाने तब्बल २७८ चेंडू खेळून काढताना नाबाद ३७ धावांची खेळी केली. ४० हून कमी धावा करण्यासाठी कोणत्याही फलंदाजाने खेळलेले हे सर्वाधिक चेंडू होते. तसेच त्याने हॅम्पशायरच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करताना जवळपास साडे सहा तास (३८१ मिनिटे) किल्ला लढवला. त्याच्या या कामगिरीची ट्विटरवर बरीच चर्चा रंगली. अनेकांनी त्याचे कौतुक केले, तर काहींनी मजेशीर ट्विट करत आमलाला ट्रोल केले. एका चाहत्याने त्याची भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराशीही तुलना केली.

First Published on: July 8, 2021 4:49 PM
Exit mobile version