कितीही मोठ्या मैदानावर षटकार लगावण्यात सक्षम!

कितीही मोठ्या मैदानावर षटकार लगावण्यात सक्षम!

शिवम दुबेचा विश्वास

मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. सलामीवीर लोकेश राहुल बाद झाल्यानंतर पहिल्या सामन्यात मॅचविनींग ९४ धावांची खेळी करणारा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरता नाही. त्याने शिवमला तिसर्‍या स्थानावर बढती दिली. उंचपुर्‍या शिवमने या संधीचे सोने करत अवघ्या ३० चेंडूत ५४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याने चार पैकी तीन षटकार विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डच्या एकाच षटकात लगावले. फटकेबाजी करायला मला आवडते आणि मी कितीही मोठ्या मैदानावर षटकार लगावण्यात सक्षम आहे, असे शिवमने सामन्यानंतर सांगितले.

तिरुअनंतपुरमचे मैदान खूप मोठे होते, पण मी कितीही मोठ्या मैदानावर षटकार लगावण्यात सक्षम आहे. तुम्हालाही हे या सामन्यात कळले असेल. मला फटकेबाजी करायला आवडते. मोठे फटके मारणे ही माझ्या खेळाची जमेची बाजू आहे. मला या सामन्यात तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आणि ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. डावाच्या सुरुवातीला नक्कीच माझ्यावर दबाव होता. मात्र, मला रोहितची (शर्मा) मदत झाली. त्याने मला संयम राखण्याचा आणि नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला. त्याच्यासारख्या सिनियर खेळाडूने प्रोत्साहन दिल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी चांगली फलंदाजी करू शकलो, असे शिवम म्हणाला.

आम्ही दमदार पुनरागमन करू!
भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यात क्षेत्ररक्षणात बर्‍याच चुका केल्या. मात्र, या चुका पुन्हा होणार नाहीत असा शिवमला विश्वास आहे. या सामन्यात आम्ही बरेच झेल सोडले. आम्हाला हे झेल पकडण्यात यश आले असते, तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता. मात्र, प्रत्येक संघ झेल सोडतो. आम्ही पुन्हा या चुका करणार नाही. आमचा संघ जगात सर्वोत्तम आहे आणि आम्ही पुढील सामन्यात दमदार पुनरागमन करू याची मला खात्री आहे, असे शिवम म्हणाला.

First Published on: December 10, 2019 5:21 AM
Exit mobile version