भारतीय संघाच्या निवड समिती सदस्यांचे मानधन कोटीत!

भारतीय संघाच्या निवड समिती सदस्यांचे मानधन कोटीत!

बीसीसीआय कार्यालय (फोटो - डेक्कन हेराल्ड)

भारताच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने १२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निवड समिती सदस्यांचे मानधन वाढवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला होता. जवळपास चार महिन्यांनंतर या निर्णयावर भारताचे माजी यष्टिरक्षक सबा करीम यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन विभागाने सकारात्मक निर्णय घेतला असून निवड समिती सदस्यांच्या वार्षिक पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

एम. एस. के. प्रसाद यांचा पगार तब्बल १ कोटी

भारतीय संघाच्या निवड समितीतील मुख्य निवडकर्ते एम. एस. के. प्रसाद यांचा पगार तब्बल २० लाखांनी वाढवला असून त्यांचा पगार आता ८० लाखांवरून १ कोटी झाला आहे. तर दुसरीकडे शरणदीप सिंग आणि देवांग गांधी यांच्या मानधनात ३० लाखांनी वाढ केली असून त्यांचा वार्षिक पगार ६० लाख रुपयांवरून थेट ९० लाख रुपये झाला आहे.

एम. एस. के. प्रसाद

तर महिला संघाच्या निवड समिती सदस्यांच्या वार्षिक पगारातही चांगली वाढ केली गेली आहे. ज्यात सदस्यांचा वार्षिक पगार २५ लाख तर मुख्य निवडकर्त्यांचा पगार ३० लाख करण्यात आला आहे. बीसीसीआयकडून करण्यात आलेल्या या पगारवाढीत ज्युनिअर निवड समितीच्या सदस्यांचीही चांदी झाली असून सदस्यांचा वार्षिक पगार ६० लाख तर मुख्य निवडकर्त्यांचा वार्षिक पगार ६५ लाख रुपये करण्यात आला आहे.

गगन खोडा आणि जतिन परांजपे या दोन माजी भारतीय टेस्ट क्रिकेटर्सना या समितीवरून मागील वर्षी काढून टाकण्यात आल्यानंतर एम. एस. के. प्रसाद, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी हे मागील वर्षीपासून निवड समितीवर कार्यरत आहेत.

First Published on: August 9, 2018 6:21 PM
Exit mobile version