…त्यावेळी मी महेंद्रसिंग धोनीचे कर्णधारपद वाचवले – एन. श्रीनिवासन

…त्यावेळी मी महेंद्रसिंग धोनीचे कर्णधारपद वाचवले – एन. श्रीनिवासन

एन श्रीनिवासन आणि महेंद्रसिंग धोनी  

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हा केवळ भारतीय नाही, तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वचषक (२००७ टी-२०, २०११ एकदिवसीय) जिंकले, तर तो कर्णधार असतानाच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली होती. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव कर्णधार आहे. मात्र, २०११ विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे झालेली कसोटी मालिका ०-४ अशी गमावण्याची नामुष्की धोनीच्या भारतीय संघावर ओढवली होती. त्यामुळे निवडकर्ते धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याच्या तयारीत होते. परंतु, तेव्हाचे बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी मध्यस्ती केल्याने धोनी कर्णधारपदी कायम राहिला.

ऑस्ट्रेलियात भारताचा निराशाजनक खेळ 

२०११ मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत आपल्या संघाला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे धोनीला कर्णधारपदावरून हटवले पाहिजे असे निवड समितीतील एका सदस्याचे मत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकला होता. असे असतानाही त्याला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडायला लावणे योग्य आहे का?, असे श्रीनिवासन म्हणाले.

मी माझे अधिकार वापरले 

कर्णधार म्हणून धोनीला पर्याय कोण आहे हेसुद्धा निवडकर्त्यांना माहित नव्हते, पण धोनीला कर्णधारपदावरून हटवायचे असे त्यांचे ठरत होते. त्यावेळी संजय जगदाळे हे बीसीसीआयचे सचिव होते आणि त्यांनी मला याबाबत माहिती दिली होती. ‘निवडकर्ते धोनीला संघात स्थान देणार आहेत, पण कर्णधार म्हणून त्याला कायम ठेवणार नाहीत’, असे जगदाळे यांनी मला सांगितले. त्यावेळी मी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून माझ्याकडे असलेले सर्व अधिकार वापरले आणि धोनीचे कर्णधारपद वाचवले, असेही श्रीनिवासन यांनी मुलाखतीमध्ये सांगितले.

First Published on: August 18, 2020 1:15 AM
Exit mobile version