ICC ODI Ranking : कोहली, बुमराह अव्वल स्थानी कायम

ICC ODI Ranking : कोहली, बुमराह अव्वल स्थानी कायम

विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याच्याप्रमाणे रोहित शर्माही फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तसेच एकदिवसीय क्रमवारीत भारताचा संघ १२१ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे.

शिखर धवन आठव्या स्थानी

विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार प्रदर्शन केले होते. या मालिकेच्या ५ सामन्यांत त्याने १५१ च्या सरासरीने ४५३ धावा केल्या होत्या. या मालिकेच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत त्याने शतके केली होती. सलग तीन एकदिवसीय सामन्यांत शतके करणारा तो पहिला भारतीय फलंदाज होता. या त्याच्या कामगिरीमुळे त्याने आपले अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे. कोहलीच्या खात्यात सध्या ८९९ गुण जमा आहेत. तर भारताचाच रोहित शर्मा ८७१ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर त्याचा सलामीचा साथीदार शिखर धवन ७६७ गुणांसह आठव्या स्थानी आहे.

भारताचे तीन गोलंदाज अव्वल १० मध्ये

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे तीन गोलंदाज अव्वल १० मध्ये आहेत. भारताच्या जसप्रीत बुमराहने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याच्या खात्यात ८४१ गुण जमा आहेत. चायनामन कुलदीप यादव ७२३ गुणांसह तिसऱ्या स्थानी तर लेगस्पिनर युझवेन्द्र चहल ६८३ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
First Published on: November 13, 2018 10:42 PM
Exit mobile version