आयसीसी कसोटी क्रमवारी पुन्हा कोहलीच नंबर वन !

आयसीसी कसोटी क्रमवारी  पुन्हा कोहलीच नंबर वन !

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर त्याचा सहकारी चेतेश्वर पुजाराने क्रमवारीत तिसर्‍या स्थानी आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अफलातून प्रदर्शन केले होते. त्याने या मालिकेतील ४ सामन्यांच्या ७ डावांत ७४.४२ च्या सरासरीने ५२१ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याने तिसर्‍या स्थानी झेप घेतली होती. कोहली ९२२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन दुसर्‍या स्थानी आहे. त्याच्या खात्यात ८९७ गुण जमा आहेत. तिसर्‍या स्थानी असलेल्या पुजाराच्या खात्यात ८८१ गुण आहेत.

द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ’मॅचविनींग’ नाबाद १५३ धावा करणार्‍या श्रीलंकेच्या कुशल परेराला ५८ स्थानांची बढती मिळाली आहे. त्यामुळे तो थेट ४० व्या स्थानावर पोहोचला आहे. द.आफ्रिकेविरुद्धच्या हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला ७८ धावांची गरज असताना त्यांच्या हातात केवळ १ विकेट होती. पण परेराने विश्वा फर्नांडोला हाताशी घेत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. फेब्रुवारी २००६ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. कमिन्सच्या खात्यात ८७८ गुण आहेत. द.आफ्रिकेच्या कागिसो रबाडाची अव्वल स्थानावरून तिसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडचा जिमी अँडरसन ८६२ गुणांसह दुसर्‍या तर रबाडा ८४९ गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे.

First Published on: February 18, 2019 4:33 AM
Exit mobile version