आय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धा

आय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धा

मास्टर्स स्पोर्ट्स असोसिएशनला जेतेपद

दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या वतीने माहूल येथे झालेल्या १९ वर्षाखालील खेळाडूंच्या आय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्स कप टी-२० क्रिकेट स्पर्धेचे नवी मुंबईच्या मास्टर्स स्पोर्ट्स असोसिएशनने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी बॉईज सी.सी. (डोंबिवली) संघावर ७ विकेट राखून विजय मिळविला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून मास्टर्स स्पोर्ट्सच्या सिद्धांत म्हात्रेला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून भूषण कस्तूर तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून शंतनू नायक यांची निवड करण्यात आली. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, आय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्सचे सोनी आणि पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

अंतिम सामन्यात बॉईज सी.सी. संघाने प्रथम फलंदाजी करताना आदित्य रावत (२९) आणि आर्य ईखे (३३) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे निर्धारित २० षटकांत ९ बाद १२२ धावा केल्या. मध्यमगती गोलंदाज मुकुंद सरदारने २७ धावांत ३ तर रोहित देसाई याने ११ धावांत २ बळी मिळवले. १२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिद्धांत म्हात्रे (५२ चेंडूत ६६) आणि श्रीराज घरात (२१) यांनी ४९ धावांची सलामी दिली. त्यानंतर म्हात्रे आणि पुष्कर शर्मा (नाबाद १९) यांनी दुसर्या विकेटसाठी ६३ धावांची भागी रचून संघाचा विजय निश्चित केला. त्यांनी हे लक्ष्य १८.४ षटकांत तीन विकेट गमावून गाठले. या स्पर्धेत १२ संघांचा सहभाग लाभला होता.

संक्षिप्त धावफलक : बॉईज सी.सी. २० षटकांत ९ बाद १२२ (आदित्य रावत २९, आर्य ईखे ३३; मुकुंद सरदार २७/३, रोहित देसाई ११/२) पराभूत वि. मास्टर्स स्पोर्ट्स क्लब – १८.४ षटकांत ३ बाद १२६ (सिद्धांत म्हात्रे ६६, श्रीराज घरत २१, पुष्कर शर्मा नाबाद १९).

First Published on: April 10, 2019 4:25 AM
Exit mobile version