IND vs AUS : तर माझ्यावर मुंबईकराला पाठिंबा देत असल्याचा आरोप होईल – गावस्कर 

IND vs AUS : तर माझ्यावर मुंबईकराला पाठिंबा देत असल्याचा आरोप होईल – गावस्कर 

सुनील गावस्कर आणि अजिंक्य रहाणे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून (आज) सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचे कर्णधारपद भूषवणाऱ्या अजिंक्य रहाणेने भारतीय गोलंदाजांचा योग्य उपयोग केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ७२.३ षटकांत १९५ धावांत संपुष्टात आला. कर्णधार म्हणून अजिंक्यने भारताच्या गोलंदाजांचा ज्याप्रकारे वापर केला, तसेच ज्याप्रकारे क्षेत्ररक्षणाची रचना केली, त्याने भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना प्रभावित केले. मात्र, अजिंक्यचे इतक्याच कौतुक करण्यास त्यांनी नकार दिला.

कर्णधार म्हणून अजिंक्यच्या कामगिरीबाबत विचारले असता गावस्कर म्हणाले, ‘इतक्यातच त्याबाबत काही बोलणे योग्य ठरणार नाही. अजिंक्यने कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली, त्याने योग्य ते निर्णय घेतले, असे मी त्याचे कौतुक केले तर मी मुंबईकराला पाठिंबा देत असल्याचा माझ्यावर आरोप होईल. त्यामुळे मी इतक्यातच अजिंक्यच्या नेतृत्वाबाबत काहीच बोलणार नाही.’

अजिंक्यने चांगले नेतृत्व केले असले, तरी गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल असे गावस्करांना वाटते. ‘अजिंक्यने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. मात्र, अश्विन, बुमराह, कसोटीत पदार्पण करणारा सिराज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे केवळ अजिंक्यच्या नेतृत्वाबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही,’ असे गावस्कर यांनी सांगितले.

First Published on: December 26, 2020 8:31 PM
Exit mobile version