टी-२० वर्ल्डकप पुढे गेल्यास यंदा आयपीएल होऊ शकेल!

टी-२० वर्ल्डकप पुढे गेल्यास यंदा आयपीएल होऊ शकेल!

करोनामुळे जगातील बहुतांश खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. करोनाच्या धोक्यामुळे आयपीएलसारखी मोठी स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले. तसेच सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमा बंद ठेवल्याने यावर्षीच्या टी-२० विश्वचषकाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत यंदा टी-२० विश्वचषक होऊ शकेल असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरला वाटत नाही. तसेच ही स्पर्धा पुढे गेल्यास या कालावधीत आयपीएल होऊ शकेल असेही मत त्याने व्यक्त केले.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, टी-२० विश्वचषक पुढे ढकलणेच योग्य ठरेल. आता आपण ज्या परिस्थितीत आहोत ते पाहता, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये १५ संघ ऑस्ट्रेलियात येणे, सात मैदानांवर सामने खेळणे, देशात विविध ठिकाणी प्रवास करणे या गोष्टी अवघड वाटत आहेत. तसेच स्पर्धेआधी खेळाडूंना १४ दिवस अलगीकरणात राहावे लागेल. त्यामुळे सध्या तरी ही स्पर्धा लांबणीवर पडेल असेच दिसते, असे टेलर म्हणाला.

तसेच त्याने पुढे सांगितले, आयसीसीने टी-२० विश्वचषक पुढे ढकलायचा निर्णय घेतल्यास आयपीएलसाठी दारे खुली होऊ शकतील. आम्ही या काळात भारतात आयपीएल घेतो असे बीसीसीआय म्हणू शकेल. या स्पर्धेत खेळायचे की नाही, याचा निर्णय क्रिकेट बोर्डांना नाही, तर खेळाडूंना घ्यावा लागेल. ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात जाऊन आयपीएल खेळले, तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर यावे लागेल.

First Published on: May 18, 2020 4:16 AM
Exit mobile version