IND vs ENG : वनडेत मधल्या फळीत खेळण्याचा फायदा; ‘या’ भारतीय फलंदाजाचे मत 

IND vs ENG : वनडेत मधल्या फळीत खेळण्याचा फायदा; ‘या’ भारतीय फलंदाजाचे मत 

लोकेश राहुल आणि विराट कोहली 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका मागील आठवड्यात पार पडली. भारतीय संघ तीन सामन्यांनंतर १-२ असा पिछाडीवर पडला होता. मात्र, भारताने अखेरचे दोन्ही सामने जिंकत ही मालिका खिशात घातली. भारताच्या या यशात सलामीवीर लोकेश राहुलला मात्र फारसे योगदान देता आले नाही. टी-२० मालिकेच्या चार सामन्यांत मिळून राहुलने केवळ १५ धावा केल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात मात्र राहुलला पुन्हा लय सापडलेली दिसली. या सामन्यात त्याने मधल्या फळीत खेळताना ४३ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करताना आणि पाचव्या क्रमांकावर खेळताना राहुलने दमदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळताना डावाच्या सुरुवातीला वेळ मिळतो. या गोष्टीचा राहुलला फायदा होत आहे.

खेळपट्टीवर वेळ घालवण्याचा प्रयत्न

टी-२० मालिकेत माझ्या धावा झाल्या नाहीत, पण पहिल्या एकदिवसीय सामन्यात मी चांगली कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळताना मला डावाच्या सुरुवातीला वेळ घेता येतो. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत खेळावे लागते. टी-२० मालिकेत माझा खेळपट्टीवर थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न होता. परंतु, मी काही चुका केल्या, असे राहुल म्हणाला.

निराशाजनक कामगिरीला ‘हे’ एक कारण

खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यानंतर फलंदाजी करणे थोडे सोपे होते. फलंदाज म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढतो. एक-दोन चौकार मारल्यावर तुमच्यावर असलेले दडपणही कमी होते, असेही राहुलने सांगितले. इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेच्या आधी राहुल जवळपास तीन महिने क्रिकेट खेळला नव्हता. त्यामुळे टी-२० मालिकेतील निराशाजनक कामगिरीच्या मागे हे एक कारण असल्याचेही राहुल म्हणाला.

First Published on: March 25, 2021 6:51 PM
Exit mobile version