IND vs ENG : गिलला दुखापत, पण राहुलला सलामीला संधी नाहीच!

IND vs ENG : गिलला दुखापत, पण राहुलला सलामीला संधी नाहीच!

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वालाही सुरुवात होईल. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु, या मालिकेला अजून महिनाभराहून अधिकचा कालावधी शिल्लक असताना भारताला धक्का बसला आहे. सलामीवीर गिल दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता असल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाच्या जवळील सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. मात्र, असे असले तरी गिलच्या जागी लोकेश राहुलला सलामीला संधी मिळणार नाही असे समजते.

राहुलला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार 

राहुलला कसोटीत नव्या चेंडूविरुद्ध खेळताना अडचणी येत असल्याचे मागील वर्षी दिसून आले. त्यामुळे त्याला सलामीला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. परंतु, तो मधल्या फळीत चांगली फलंदाजी करू शकेल असे संघ व्यवस्थापनाला वाटत आहे, असे सूत्रांनी सांगितले. राहुलने आतापर्यंत ३६ कसोटी सामन्यांत ३४.५८ च्या सरासरीने २००६ धावा केल्या आहेत. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु, सप्टेंबर २०१९ पासून त्याने कसोटी सामना खेळलेला नाही.

विहारीला मिळू शकेल सलामीला संधी

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ गिलच्या जागी सलामीवीर म्हणून मयांक अगरवालला संधी देण्याची दाट शक्यता आहे. मयांकला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्यास हनुमा विहारीला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा संघ व्यवस्थापन विचार करू शकेल. नव्या चेंडूविरुद्ध खेळण्याची क्षमता असल्याचे विहारीने याआधी दाखवले आहे, असे सूत्रांनी सांगितले. विहारीने याआधी सलामीवीर म्हणून केवळ एक कसोटी सामना खेळला असून त्यात दोन डावांत मिळून २१ धावा केल्या होत्या. परंतु, त्याला १११ चेंडू खेळून काढण्यात यश आले होते.

First Published on: July 1, 2021 4:01 PM
Exit mobile version