IND vs ENG Women : शेफाली वर्माची फटकेबाजी; दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयासह भारताची मालिकेत बरोबरी

IND vs ENG Women : शेफाली वर्माची फटकेबाजी; दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयासह भारताची मालिकेत बरोबरी

भारताची सलामीवीर शेफाली वर्मा

सलामीवीर शेफाली वर्माची फटकेबाजी आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळामुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ८ धावांची पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या ३० चेंडूत केवळ ३३ धावांची आवश्यकता होती. तसेच सहा विकेट त्यांच्या हातात होत्या. परंतु, पूनम यादव (१७ धावांत २ विकेट) आणि दीप्ती शर्मा (१८ धावांत १ विकेट) यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आला. हा दबाव त्या हाताळू शकल्या नाहीत आणि भारताने सामना ८ धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली.

शेफालीचे एकाच षटकात पाच चौकार  

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताकडून शेफाली वर्मा (३८ चेंडूत ४८) आणि स्मृती मानधना (१६ चेंडूत २०) यांनी ७० धावांची सलामी दिली. शेफालीने फटकेबाजी करताना कॅथरीन ब्रंटच्या एकाच षटकात पाच चौकारही मारले. या दोघी बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर (२५ चेंडूत ३१) आणि दीप्ती शर्मा (२७ चेंडूत नाबाद २४) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ४ बाद १४८ अशी धावसंख्या उभारली.

ब्यूमॉन्टचे अर्धशतक वाया

१४९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्टने उत्तम फलंदाजी करताना ५० चेंडूत ५९ धावांची खेळी केली. तिला कर्णधार हेथर नाईटने २८ चेंडूत ३० धावा करत चांगली साथ दिली. यानंतर मात्र भारताच्या फिरकीपटूंच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव गडगडला. इंग्लंडला अखेरच्या पाच षटकांत केवळ २४ धावा करता आल्याने त्यांनी हा सामना गमावला.
First Published on: July 12, 2021 4:53 PM
Exit mobile version