Ind vs Eng : बुमराहला डिवचणाऱ्या अँडरसनला विराट कोहली मैदानात भिडला, पाहा व्हिडिओ

Ind vs Eng : बुमराहला डिवचणाऱ्या अँडरसनला विराट कोहली मैदानात भिडला, पाहा व्हिडिओ

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ सुरु असताना इंग्लंडचा जलगती गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात तुतु-मैं मैं झालेली पाहायला मिळाली. पीचवरुन चालणाऱ्या अँडरसनला विराट कोहलीने खेळपट्टीवरुन चालत असल्याची आठवण करुन देताना कठोर शब्दांचा वापर केला. विराट-अँडरसनमधील भांडणाचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमधील वाद वाढताना दिसतोय. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला डिवचताना दिसला. अँडरसन फलंदाजी करत असताना बुमराहने एक बाउन्सर टाकला होता. बुमराह अँडरसनला बाद करू शकला नसला तरी त्याने त्याच्यावर दबाव आणला होता, त्याचा फायदा मोहम्मद शमीने घेतला. त्याने अँडरसनला क्लीन बोल्ड केले आणि इंग्लंडचा डाव ३९१ धावांवर गुंडाळला.

शमीने अँडरसनला दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. नंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते, तेव्हा अँडरसन बुमराहला काहीतरी सांगताना दिसला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने हस्तक्षेप करून अँडरसनला रोखले. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली जेम्स अँडरसनवर भडकलेला दिसला. गोलंदाजी करायला जात असताना अँडरसन विराट कोहलीला काहीतरी बोलला. त्यानंतर कोहलीने त्याला उत्तर दिलं. ‘ही खेळपट्टी आहे आणि तु इथे धावत आहेस, हे तुझं घर नाही,’ असं विराट म्हणाला.

भारताची खराब सुरुवात

सामन्याची चौथ्या दिवशी सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात करुन दिली. मात्र, पहिल्या डावात शतक मारणारा राहुल आणि अर्धशतक मारणारा रोहित शर्मा दोघेही स्वस्तात बाद झाले. राहुल ५ तर रोहित २१ धावा काढून तंबूत परतला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने दोघांनाही माघारी धाडले. त्यानंतर आलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीही २० धावांवर बाद झाला. भारताच्या ५२ षटकात ३ बाद १०५ धावा झाल्या असून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मैदानात आहेत.

 

First Published on: August 15, 2021 8:18 PM
Exit mobile version