न्यूझीलंड दौर्‍यात दमदार कामगिरीचा विश्वास!

न्यूझीलंड दौर्‍यात दमदार कामगिरीचा विश्वास!

Rohit Sharma

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. परंतु, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये त्याला कसोटीत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने तीन शतके (एका द्विशतकासह) लगावत या संधीचे सोने केले. आता भारताचा संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार असून यात दोन कसोटी सामने खेळणार आहे. सलामीवीर म्हणून रोहितची या दौर्‍यात खरी कसोटी लागणार आहे असे मत अनेक क्रिकेट समीक्षक व्यक्त करत आहेत. मात्र, रोहित या आव्हानासाठी तयार आहे.

न्यूझीलंडमध्ये खेळणे अवघड असते. नव्या चेंडूचा सामना करणे कोणत्याही परिस्थितीत सोपे नसते, पण भारताबाहेर हे आव्हान अधिकच अवघड होते. मात्र, आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामने खेळलो आणि या मालिकेत चेंडू खूप स्विंग झाला. खासकरुन पुण्यात झालेल्या सामन्याची खेळपट्टी सुरुवातीला थोडी ओलसर होती आणि याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झाला. रांचीमध्ये झालेल्या सामन्यातही आम्ही झटपट तीन विकेट्स गमावल्या. त्यामुळे कठीण परिस्थितीत खेळणे माझ्यासाठी नवीन नाही. न्यूझीलंडमध्ये झालेल्या मागील कसोटी मालिकेत (२०१४) मी खेळलो होतो. तिथे कसे खेळायचे हे मला ठाऊक आहे. या दौर्‍यात दमदार कामगिरीचा मला विश्वास आहे, असे रोहित म्हणाला.

रोहितने मागील वर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून २४४२ धावा फटकावल्या. सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला.त्याविषयी रोहितने सांगितले, स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाने केलेल्या अप्रतिम कामगिरीचा मला जास्त आनंद आहे. वैयक्तिक विक्रमांचा मी विचार करत नाही. तुम्ही जर चांगला खेळ करत असाल तर विक्रम आपोआपच होतात.

First Published on: January 8, 2020 3:21 AM
Exit mobile version