IND vs SL 3rd ODI : भारताची फलंदाजी; सॅमसनसह पाच खेळाडूंना वनडेत पदार्पणाची संधी

IND vs SL 3rd ODI : भारताची फलंदाजी; सॅमसनसह पाच खेळाडूंना वनडेत पदार्पणाची संधी

संजू सॅमसनसह पाच खेळाडूंना वनडेत पदार्पणाची संधी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज कोलंबो येथे खेळला जात आहे. भारताने पहिले दोन्ही एकदिवसीय सामने जिंकत या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज होत असलेल्या तिसऱ्या सामन्यासाठी भारताने संघामध्ये तब्बल सहा बदल केले आहेत. श्रीलंकेने या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. या सामन्यात मात्र नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताच्या पाच खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

नवदीप सैनीचाही संघात समावेश

भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने श्रीलंका दौऱ्यात जास्तीतजास्त खेळाडूंना संधी देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसन, नितीश राणा, राहुल चहर, चेतन साकारिया आणि कृष्णप्पा गौतम हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतील. सॅमसन या सामन्यात यष्टिरक्षणाची धुरा सांभाळेल. तसेच वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना मात्र संधी मिळू शकलेली नाही.

‘या’ खेळाडूंना विश्रांती 

भारताने या सामन्यासाठी संघात एकूण सहा बदल केले आहेत. मागील दोन सामन्यांत खेळणाऱ्या ईशान किशन, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार आणि मागील सामन्यातील सामनावीर दीपक चहर यांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारताच्या या संघातील केवळ हार्दिक पांड्या आणि नवदीप सैनी या गोलंदाजांनी याआधी एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे.

First Published on: July 23, 2021 2:58 PM
Exit mobile version