IND vs SL : भारताविरुद्धच्या वनडे, टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेने निवडला नवा कर्णधार

IND vs SL : भारताविरुद्धच्या वनडे, टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेने निवडला नवा कर्णधार

भारताविरुद्धच्या वनडे, टी-२० मालिकेसाठी दसून शानका श्रीलंकेच्या कर्णधारपदी

भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या २४ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कुसाल परेरा खांद्याच्या दुखापतीमुळे या दोन्ही मालिकांना मुकणार असून त्याच्या जागी अष्टपैलू दसून शानकाची श्रीलंकेच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. शानका श्रीलंकन संघाचा मागील पाच वर्षांतील दहावा कर्णधार आहे. परेराची मे महिन्यात श्रीलंकेचा कर्णधार म्हणून निवड झाली होती. परंतु, त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेने तिन्ही मालिका गमावल्या. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात येणार अशी श्रीलंकन प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती. त्यानुसार आता शानकाची कर्णधारपदी निवड झाली आहे.

युवा यष्टिरक्षकांची निवड

कुसाल परेरा भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. सरावादरम्यान यष्टीरक्षक-फलंदाज परेराच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली, असे श्रीलंका क्रिकेटने आपल्या पत्रकात म्हटले होते. तसेच इंग्लंड दौऱ्यात जैव-सुरक्षित नियमांचे उल्लंघन केल्याने यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेसाठी मिनोद भानुका आणि लाहिरू उडारा या दोन युवा यष्टिरक्षकांची श्रीलंकन संघात निवड झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला येत्या रविवारी (१८ जुलै) सुरुवात होणार आहे.

श्रीलंकन संघ : दसून शानका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उपकर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निशंका, चरिथ असलांका, वानिंदू हसरंगा, अशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणरत्ने, चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरण फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरू कुमारा, इसुरू उदाना, बिनुरा फर्नांडो.

First Published on: July 16, 2021 10:11 PM
Exit mobile version