वेस्ट इंडिजला अजूनही पुनरागमनाची संधी

वेस्ट इंडिजला अजूनही पुनरागमनाची संधी

शिमरॉन हेथमायर (सौ-thenational)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विराट कोहली आणि रोहित शर्माच्या दमदार प्रदर्शनामुळे भारताने ८ विकेट राखून जिंकला. पण तरीही वेस्ट इंडिजला दुसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे.

विंडीज गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयश

गुवाहाटीमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेले ३२३ धावांचे आव्हान भारताने अवघ्या ४२.१ षटकांत गाठले. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही शतके केली. ही मालिका भारताच्या मधल्या फळीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती. अंबाती रायडू, रिषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या प्रदर्शनावर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची नजर होती. पण वेस्ट इंडिजची दुबळी गोलंदाजी लक्षात घेता या तिघांना मोठ्या धावा करायची संधी मिळेल यात शंकाच आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयश आले. त्यांच्या राखीव फळीतही गोलंदाजीचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे भारतीय फलंदाज यापुढेही आपला दबदबा कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे चांगले प्रदर्शन

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगले प्रदर्शन केले. त्यांचा युवा फलंदाज शिमरॉन हेथमायर याने आक्रमक शतक झळकावले. त्याला किरन पॉवेल, शाई होप, कर्णधार होल्डर आणि रोवमन पॉवेल यांनी चांगली साथ दिली. विंडीजच्या फलंदाजांनी बुमराह-भुवनेश्वर या वेगवान जोडगोळीविना खेळणाऱ्या भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला चांगली गोलंदाजी करता आली नाही. तर उमेश यादव आणि खलील अहमद हेही विंडीज फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयशी ठरले. त्यामुळे चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
First Published on: October 24, 2018 3:00 AM
Exit mobile version