एकटा विराट भारताला विश्वचषक जिंकवू शकत नाही!

एकटा विराट भारताला विश्वचषक जिंकवू शकत नाही!

सचिन तेंडुलकर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या तीनही प्रकारांत त्याने अप्रतिम कामगिरी केली असली, तरी एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी त्याची खूप खास आहे. त्याने अवघ्या २२७ सामन्यांत ४१ शतके केली असून तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणार्‍या फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानी आहे. तो संघात असल्यामुळेच भारताला आगामी विश्वचषक जिंकण्याचे दावेदार मानले जात आहे. मात्र, एकटा विराट भारताला विश्वचषक जिंकवू शकत नाही, असे विधान भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने केले आहे.

विराटवर या विश्वचषकात किती दबाव आहे आणि तो भारताला ही स्पर्धा जिंकवून देऊ शकेल का, असे सचिनला विचारले असता तो म्हणाला, प्रत्येक सामन्यात एखादा खेळाडू जबाबदारीने खेळ करत आपल्या संघाला सामना जिंकवून देऊ शकतो. मात्र, एकच खेळाडू तुम्हाला विश्वचषकासारखी स्पर्धा जिंकवून देऊ शकत नाही. संघामधील सर्व खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले, तरच संघ विश्वविजेता होऊ शकतो.

या संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा अजूनही प्रश्न आहे. मात्र, भारताला याची फार चिंता करण्याची गरज नाही, असे सचिन म्हणाला. भारताकडे या क्रमांकावर खेळू शकतील असे बरेच फलंदाज आहेत. त्यामुळे भारताला फार चिंता करण्याची गरज नाही. भारताच्या खेळाडूंनी आता बरेच सामने खेळले असून त्यांना कोणत्या परिस्थितीत कशी फलंदाजी करायची हे ठाऊक आहे, असे सचिनने सांगितले.

First Published on: May 23, 2019 4:13 AM
Exit mobile version