IND vs AUS t20 : टीम इंडियाची विजयी सलामी; चहल ठरला मॅचविनर

IND vs AUS t20 : टीम इंडियाची विजयी सलामी; चहल ठरला मॅचविनर

युजवेंद्र चहल

‘कन्कशन सब्स्टीट्युट’ म्हणून मैदानात आलेल्या लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा टी-२० क्रिकेटमध्ये हा सलग नववा विजय ठरला. चहलने २५ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. मिचेल स्टार्कने शिखर धवनला (१), तर लेगस्पिनर मिचेल स्वॅपसन कर्णधार विराट कोहलीला (९) झटपट माघारी पाठवले. मात्र, सलामीवीर लोकेश राहुल आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला. राहुलने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, मोईसेस हेन्रिक्सने सॅमसन (२३) आणि राहुल (५१) यांना सलग दोन षटकांत बाद करत भारताला अडचणीत टाकले. हेन्रिक्सनेच हार्दिक पांड्यालाही (१६) माघारी पाठवले. मात्र, अखेरच्या षटकांत रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत २३ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ७ बाद १६१ अशी धावसंख्या उभारली.

१६२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली. कर्णधार फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी ५६ धावांची सलामी दिली. परंतु, चहलने फिंच (३५) आणि स्टिव्ह स्मिथ (१२) या ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांना सलग दोन षटकांत बाद केले. तर नटराजनने शॉर्ट (३४) आणि ग्लेन मॅक्सवेल (२) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अखेरच्या षटकांमध्ये हेन्रिक्सने (३०) ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ बाद १५० धावाच करता आल्या. भारताकडून चहल आणि नटराजन यांनी ३-३ विकेट घेतल्या.

 

First Published on: December 4, 2020 6:42 PM
Exit mobile version