फुटबॉल सामन्यात भिडल्यानंतर भारताने पाकिस्तानचा केला पराभव; Video व्हायरल

फुटबॉल सामन्यात भिडल्यानंतर भारताने पाकिस्तानचा केला पराभव; Video व्हायरल

नवी दिल्ली : बंगळुरुमध्ये खेळल्या जात असलेल्या सॅफ चॅम्पियनशिप (SAFF Championship) सामन्यात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ आमनेसामने आले होते. दोन्ही संघात चुरशीची लढत झाली, पण सामन्याच्या 44 व्या मिनिटाला भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही संघातील तांत्रिक कर्मचारीही या भांडणात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर रेफरीने भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमच यांना लाल कार्ड दाखवला. (India defeated Pakistan after clashing in a football match Video viral)

भांडणाला कशी सुरूवात झाली?

पहिला हाफ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना भारतीय संघाचा खेळाडू संदेश झिंगाने प्रीतम कोटलला पास दिला, परंतु प्रतीमला चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि चेंडू ऑफसाईडला गेला. त्यामुळे पाकिस्तानला थ्रो इन मिळाला. पाकिस्तानचा खेळाडू चेंडू उचलून आत टाकणार इतक्यात त्याच्या बाजूला असलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमच यांनी चेंडूला मागून फटका मारला. त्यामुळे चेंडू पाकिस्तानी खेळाडूच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि वाद सुरू झाला. प्रशिक्षक स्टिमॅच आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये सुरू असलेला वाद थांबवण्याचा रेफरीने प्रयत्न केला, पण यावेळी पाकिस्तानचे इतर खेळाडू त्याठिकाणी आले आणि वाद वाढू लागला. दरम्यान भारतीय खेळाडूंही त्याठिकाणी आल्यानंतर हाणामारी सुरू झाली. यावेळी भारतीय कर्णधार सुनील छेत्री पाकिस्तानच्या खेळाडूंना समजावताना बाजूला करताना दिसला. दोन मिनिटे गोंधळ सुरू होता. यावेळी पाकिस्तानी संघाचे खेळाडू आक्रमक होताना दिसले, तर पाकिस्तानी प्रशिक्षकानेही संताप व्यक्त केला.

भारताने 4-0 ने जिंकला सामना

सॅफ चॅम्पियनशिप सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव केला. भारताकडून कर्णधार सुनील छेत्रीने हॅट्ट्रिक केली, तर उदांता सिंगने चौथा गोल केला. यामुळे भारतीय संघाने सामना सहज जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला. छेत्रीने पहिल्या हाफमध्ये दोन गोल केले. त्याने पहिला गोल 10व्या मिनिटाला केला, यानंतर लगेच 16व्या मिनिटाला दुसरा गोल केला. हाफ टाइमपर्यंत 2-0 ने स्कोअर  भारताच्या बाजूने होता. भारतीय संघाने दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर संघावर पहिल्या हाफमधील दडपण कायम ठेवले. यामुळे छेत्रीने 74व्या मिनिटाला पेनल्टीवर पुन्हा एकदा गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. छेत्रीनंतर उदांता सिंगने 81व्या मिनिटाला गोल करून भारताचा स्कोअर 4-0 असा केला. त्यामुळे पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयानंतर भारताला 24 जूनला नेपाळविरुद्ध सामना खेळायचा आहे.

फिफा क्रमवारीत भारतीय संघ सर्वोत्तम 

SAFF चॅम्पियनशिपच्या 14 व्या आवृत्तीत आठ संघ सहभागी होत आहेत. त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह कुवेत, नेपाळ आणि पाकिस्तानचा संघाचा समावेश आहे, तर ब गटात लेबनॉन, मालदीव, भूतान आणि बांगलादेश हे संघ आहेत. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेतील फिफा क्रमवारीत सर्वोत्तम संघ आहे. फिफा क्रमवारीत भारतीय संघ 101 व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तानची क्रमवारी सर्वात वाईट आहे. फिफा क्रमवारीत पाकिस्तान 195व्या क्रमांकावर आहे.

 

 

First Published on: June 22, 2023 2:59 PM
Exit mobile version