भारत ‘पुन्हा एकदा’ पराभूत

भारत ‘पुन्हा एकदा’ पराभूत

सौजन्य - Cricinfo

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा शेवटचा दिवस भारतासाठी खास राहिला. भारताचे फलंदाज लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांना या मालिकेत चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. पण मालिकेच्या शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या डावात या दोघांनीही शतक झळकावले.

राहुल, रहाणेचा डाव सावरण्याचा प्रयत्न 

आधीच मालिका गमावणाऱ्या भारताला हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने ४६४ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. भारताने २ धावांतच ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे ३७ धावांवर असताना मोईन अलीने त्याला बाद केले.

पंतचे पहिले शतक 

पुढे फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतने राहुलच्या साथीने अप्रतिम खेळ केला. दरम्यान राहुलने या मालिकेतील आपले पहिले शतक पूर्ण केले. तर रिषभ पंतने आपल्या आक्रमक शैलीत खेळ केला. त्याने ७३ व्या षटकात आदिल रशीदला षटकार लगावत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

झटपट विकेट गमावत भारत पराभूत

हे दोघे भारताला विजय मिळवून देतील असे वाटत असतानाच रशीदने राहुलला १४९ धावांवर बाद केले. तर रशीदनेच त्याच्या पुढच्या पंतलाही माघारी पाठवले. त्यानंतर इशांत, जडेजा, शमी झटपट बाद झाल्याने भारताने हा सामना ११८ धावांनी गमावला. तसेच भारताने ही मालिका ४-१ अशी गमावली.
First Published on: September 11, 2018 11:23 PM
Exit mobile version