इंडिया ओपन बॅडमिंटन डिसेंबरमध्ये

इंडिया ओपन बॅडमिंटन डिसेंबरमध्ये

करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ८ ते १३ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) शुक्रवारी यंदाच्या मोसमातील उर्वरित स्पर्धांसाठी नव्याने वेळापत्रक जाहीर केले. नवी दिल्लीत होणारी इंडिया ओपन स्पर्धा यावर्षी २४ ते २९ मार्च या कालावधीत पार पडणार होती. परंतु, करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलणे बीडब्ल्यूएफला भाग पडले. मात्र, आता ही स्पर्धा यावर्षाच्या अखेरीस होणार आहे.

बॅडमिंटनपटूंना इंडिया ओपन स्पर्धेतून पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेआधी भारतात हैदराबाद ओपन (११ ते १६ ऑगस्ट) आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय (१७ ते २२ नोव्हेंबर) या दोन स्पर्धा होणार आहे. बीडब्ल्यूएफला आठ स्पर्धांसाठी नव्याने वेळापत्रक बनवणे भाग पडले. यात न्यूझीलंड ओपन सुपर ३००, इंडोनेशिया ओपन सुपर १०००, मलेशिया ओपन सुपर ७५०, थायलंड ओपन सुपर ५०० आणि चीनमध्ये होणारी वर्ल्ड टूर फायनल्स या स्पर्धांचा समावेश आहे.

बॅडमिंटनला ११ ऑगस्टपासून सुरुवात

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला ११ ऑगस्टला होणार्‍या हैदराबाद ओपन स्पर्धेपासून सुरुवात होणार आहे. १५ मार्चला संपलेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेपासून या खेळाचे सामने झालेले नाहीत. परंतु, आता लवकरच पुन्हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला सुरुवात होणार आहे. ऐरवी हैदराबाद ओपनमध्ये आघाडीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळतात. यंदा मात्र चित्र थोडे वेगळे दिसू शकेल. या स्पर्धेनंतर २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत चीन मास्टर्स स्पर्धा पार पडेल.

First Published on: May 23, 2020 4:33 AM
Exit mobile version