WTC Final : क्वारंटाईन असताना भारतीय क्रिकेटपटूंचा जोरदार सराव; पहा व्हिडिओ

WTC Final : क्वारंटाईन असताना भारतीय क्रिकेटपटूंचा जोरदार सराव; पहा व्हिडिओ

क्वारंटाईन असताना भारतीय क्रिकेटपटूंचा जोरदार सराव

आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताचे क्रिकेटपटू सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन आहेत. मात्र, क्वारंटाईन असतानाही त्यांनी जोरदार सराव सुरु केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबतचा एका व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला. या व्हिडिओमध्ये यष्टीरक्षक रिषभ पंत, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, युवा फलंदाज शुभमन गिल यांसारखे खेळाडू जिममध्ये घाम गाळताना दिसले. भारताचे खेळाडू आठ दिवस मुंबईत क्वारंटाईन असणार आहेत. त्यानंतर ते इंग्लंडसाठी रवाना होतील. इंग्लंडमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना, तसेच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारतीय खेळाडू मुंबईत क्वारंटाईन

इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत क्वारंटाईन आहेत. काही खेळाडू आधीच मुंबईत तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये आले होते. तर कर्णधार विराट कोहली, प्रमुख सलामीवीर रोहित शर्मा आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे मुंबईत राहणारे भारतीय संघाचे सदस्य मंगळवारी बायो-बबलमध्ये दाखल झाले.

लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळावा यासाठी बीसीसीआयने सोय केली आहे. भारतात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी लसीचा पहिला डोस घेतला. आता पात्र झाल्यावर त्यांना लसीचा दुसरा डोस इंग्लंड आरोग्य विभागाकडून देण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

First Published on: May 26, 2021 4:30 PM
Exit mobile version