IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा संघ मूर्खपणे खेळला; दिग्गज क्रिकेटपटूची टीका

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा संघ मूर्खपणे खेळला; दिग्गज क्रिकेटपटूची टीका

इंग्लंडच्या संघावर दिग्गज क्रिकेटपटूची टीका

लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने आघाडी मिळवली होती. तसेच पाचव्या दिवशीही भारताचा संघ अडचणीत होता. भारताची ८ बाद २०९ अशी अवस्था झाली होती. यानंतर मात्र मोहम्मद शमी (नाबाद ५६) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद ३४) यांनी ८९ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित करत इंग्लंडपुढे विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे इंग्लंडचा डाव १२० धावांत आटोपला आणि भारताने हा सामना जिंकला. इंग्लंडने या सामन्यात मूर्खपणे खेळ केला अशी टीका इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांनी केली.

कर्णधार म्हणून रूटकडून चुका

दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने मूर्खपणा केला, तर भारतीय संघ उत्कृष्ट खेळला, असे बॉयकॉट म्हणाले. या कसोटी सामन्याने दोन गोष्टी सिद्ध केल्या. एक म्हणजे, तुम्ही मूर्खपणे खेळल्यास सामना जिंकू शकत नाही. फलंदाज म्हणून जो रूटचे आपण चाहते आहोत. परंतु, कर्णधार म्हणून तो बऱ्याच चुका करतो. दुसरी गोष्ट म्हणजे, इंग्लंडचा संघ धावा करण्यासाठी केवळ रूटवर अवलंबून राहू शकत नाही. अव्वल तीन फलंदाजांच्या कामगिरी लवकर सुधारणा होणे गरजेचे आहे, असे बॉयकॉट यांनी नमूद केले.

भारताने उत्कृष्ट खेळ केला

तसेच इंग्लंडने शमी आणि बुमराह यांची विकेट घेण्यापेक्षा त्यांना इजा पोहोचवण्यावर इंग्लंडचा भर होता, असेही ते म्हणाले. इंग्लंडवर  टीका करतानाच बॉयकॉट यांनी भारतीय संघाचे कौतुकही केले. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडचे पारडे जड होते. त्यानंतर ते इतके वाईट खेळतील असे वाटले नव्हते. परंतु, भारताला श्रेय दिलेच पाहिजे. त्यांनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांचे अभिनंदन.


हेही वाचा – एकाशी पंगा घ्याल, तर आम्ही सगळे उत्तर देऊ! राहुलची प्रतिस्पर्ध्यांना ताकीद


 

First Published on: August 17, 2021 8:53 PM
Exit mobile version