IND vs ENG 3rd Test : रूटची बॅट पुन्हा तळपली; केले मालिकेतील तिसरे शतक

IND vs ENG 3rd Test : रूटची बॅट पुन्हा तळपली; केले मालिकेतील तिसरे शतक

इंग्लंडचा कर्णधार जो रूटचे पुन्हा शतक

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारताविरुद्धची दमदार कामगिरी तिसऱ्या कसोटी सामन्यातही सुरु ठेवली. पहिल्या दोन्ही कसोटीत शतक करणाऱ्या रूटने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही शतकी खेळी केली. हेडिंग्ले या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रूटने या डावात आक्रमक शैलीत फलंदाजी केली. ईशांत शर्मा टाकत असलेल्या इंग्लंडच्या डावातील १०४ थ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत रूटने त्याचे कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक पूर्ण केले. त्याने हे शतक करण्यासाठी १२४ चेंडू घेतले. त्याच्या या शतकी खेळीत १२ चौकारांचा समावेश होता. अखेर १२१ धावांवर त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले.

मलानसोबत १३९ धावांची भागीदारी 

इंग्लंडने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात बिनबाद १२० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स (६१) आणि हसीब हमीद (६८) काही काळाने बाद झाले. यानंतर मात्र रूटने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या डाविड मलानसोबत (७०) तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी रचली. रूटने अवघ्या ५७ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्याने पुढेही चांगली फलंदाजी सुरु ठेवत १२४ चेंडूत शतक झळकावले.

भारताविरुद्ध आठवे कसोटी शतक

रूटचे हे कसोटीतील २३ वे शतक ठरले. तसेच हे त्याचे भारताविरुद्ध आठवे कसोटी शतक होते. त्याने भारताविरुद्ध २३ कसोटीत ६३ हूनही अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात रूटने ६४ आणि १०९ धावांची, तर दुसऱ्या कसोटीत नाबाद १८० आणि ३३ धावांची खेळी केली होती. तिसऱ्या कसोटीतही त्याने शतक झळकावले. तसेच या खेळीदरम्यान त्याने इंग्लंडचा कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला.

हेही वाचा – कोहलीने प्रथम फलंदाजी घेऊन धोका पत्करला; माजी क्रिकेटपटूची टीका


First Published on: August 26, 2021 10:05 PM
Exit mobile version