IND vs ENG : भारताचा डाव गडगडला; पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी 

IND vs ENG : भारताचा डाव गडगडला; पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी 

जो रूट

जॅक लिच आणि कर्णधार जो रूट या इंग्लंडच्या फिरकीपटूंनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव गडगडला. भारताने या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ३ बाद ९९ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु, पहिल्या सत्रात भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला. त्यामुळे भारताचा डाव १४५ धावांत आटोपला आणि त्यांना पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून ऑफस्पिनर रूटने पाच, तर डावखुरा फिरकीपटू लिचने चार विकेट घेतल्या. अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या डे-नाईट सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहेत. इंग्लंडच्या पहिल्या डावात अश्विन आणि अक्षर पटेल या भारतीय जोडगोळीने ९ विकेट घेतल्या होत्या. तर भारताच्या पहिल्या डावात रूट आणि लिचने मिळून ९ गडी बाद केले.

४६ धावांत ७ विकेट

या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत संपुष्टात आला होता. याचे उत्तर देताना पहिल्या दिवसअखेर भारतीय संघ ३ बाद ९९ असा सुस्थितीत होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सुरुवातीपासूनच भारताने झटपट विकेट गमावल्या. लिचने रोहित (६६) आणि अजिंक्य रहाणे (७) या दोघांना पायचीत पकडले. यानंतर अश्विनने काही चांगले फटके मारत १७ धावा केल्या. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा डाव १४५ धावांत आटोपला. भारताने दुसऱ्या दिवशी ४६ धावांत ७ विकेट गमावल्या. इंग्लंडकडून रूटने ८ धावांत ५ विकेट, तर लिचने ५४ धावांत ४ विकेट घेतल्या.

First Published on: February 25, 2021 4:20 PM
Exit mobile version