IND vs ENG : सिबले आऊट, मलान इन; तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

IND vs ENG : सिबले आऊट, मलान इन; तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

डाविड मलानचे इंग्लंड कसोटी संघात पुनरागमन

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर डॉम सिबलेला डच्चू देण्यात आला असून डावखुरा फलंदाज डाविड मलानचे इंग्लंड कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडला चांगला खेळ करता आलेला नाही. पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी होती, पण पाचव्या दिवशी पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या कसोटीत मात्र भारताने उत्कृष्ट खेळ करत १५१ धावांनी विजय मिळवला. या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १२० धावांत आटोपला. तसेच दोन सामन्यांत कर्णधार जो रूट वगळता इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला आहे. त्यामुळे २५ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बदल करण्यात आला आहे.

सिबलेची निराशाजनक कामगिरी

सलामीवीर सिबलेला मागील काही काळात धावांसाठी झुंजावे लागले आहे. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २० हूनही कमीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटीच्या चार डावांत मिळून सिबलेला केवळ ५७ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी त्याला इंग्लंडच्या संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी मलानची संघात निवड झाली आहे. मलानने आतापर्यंत १५ कसोटी सामन्यांत २७.८४ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. त्याने अखेरचा कसोटी सामना ऑगस्ट २०१८ मध्ये भारताविरुद्धच खेळला होता.

बर्न्स आणि हमीद सलामीला 

सिबलेप्रमाणेच झॅक क्रॉलीलाही इंग्लंड संघातून डच्चू देण्यात आला आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत रोरी बर्न्स आणि हसीब हमीद इंग्लंडच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. तसेच मलान तिसऱ्या आणि कर्णधार रूट चौथ्या क्रमांकावर खेळेल. रूटने पहिल्या दोन कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करताना दोन शतकांसह ३८६ धावा केल्या आहेत. त्याला इतर फलंदाजांची फारशी साथ मिळालेली नाही.


हेही वाचा – इंग्लंडचा संघ मूर्खपणे खेळला; दिग्गज क्रिकेटपटूची टीका


 

First Published on: August 18, 2021 9:55 PM
Exit mobile version