IND vs ENG Women : तब्बल २४०१ दिवसांनी पुन्हा कसोटी क्रिकेटसाठी भारतीय महिला संघ सज्ज

IND vs ENG Women : तब्बल २४०१ दिवसांनी पुन्हा कसोटी क्रिकेटसाठी भारतीय महिला संघ सज्ज

स्मृती मानधना, झुलन गोस्वामी आणि जेमिमा रॉड्रिग्स सराव करताना

मिताली राजचा भारतीय महिला संघ पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला ब्रिस्टल येथे बुधवारपासून सुरुवात होणार आहे. जवळपास सात वर्षे आणि तब्बल २४०१ दिवसांनंतर भारतीय महिला संघाला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघाला या सामन्यासाठी सराव करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. परंतु, भारताच्या महिला क्रिकेटपटूंना याआधी इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव असून त्यांनी कसोटी सामनाही जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडला झुंज देईल अशी अपेक्षा आहे.

भारताच्या खेळाडू मानसिकदृष्ट्या तयार

आधी भारतात आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर बराच काळ क्वारंटाईन व्हावे लागल्याने भारताच्या महिला क्रिकेटपटूंना या कसोटी सामन्याच्या सरावासाठी फारसा वेळ मिळालेला नाही. परंतु, भारताच्या खेळाडू मानसिकदृष्ट्या या सामन्यासाठी तयार असल्याचे उपकर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली. भारतीय महिला संघ आपला अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात खेळलेल्या मिताली, हरमन, स्मृती मानधना आणि झुलन गोस्वामी यांसारख्या सात खेळाडू अजूनही संघात आहेत. मात्र, त्यांना जवळपास सात वर्षांत एकही कसोटी सामना खेळायला मिळालेला नाही.

भारताच्या युवा खेळाडूंची कसोटी

तसेच स्थानिक क्रिकेटमध्येही महिलांचे प्रथम श्रेणी सामने होत नसल्याने आता विशेषतः भारताच्या युवा खेळाडूंची खरी कसोटी असणार आहे. परंतु, या सामन्यात भारतीय संघाला सलग चौथा कसोटी विजय मिळवण्याची संधी आहे. तसे झाल्यास सर्वाधिक सलग कसोटी सामने जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रममितालीचा संघ मोडीत काढेल.

First Published on: June 15, 2021 10:15 PM
Exit mobile version