इंटरकॉन्टिनेंटल कपवर भारताची मोहर

इंटरकॉन्टिनेंटल कपवर भारताची मोहर

इंटरकॉन्टीनेंटल कप घेऊम भारतीय संघ

सुनील छेत्री जगात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूत दुसरा

भारत आणि केनिया यांच्यात झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपच्या अंतिम सामन्यात भारताने केनियाला २-० ने पराभूत करत टुर्नामेंटचे जेतेपद पटकावले आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या दोन गोलमुळे भारताने या सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे छेत्रीने केलेल्या या दोन गोलमुळे तो सर्वाधिक गोल करणाऱ्या सध्या खेळणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत अर्जेंटिनाचा खेळाडू लियोनेल मेस्सीसोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या दोघांच्या नावावर आता ६४ आंतरराष्ट्रीय गोल्सची नोंद आहे.

फ्री किकचा बोनस

चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारताला पहिली मोठी संधी सातव्या मिनिटाला मिळाली. केनियाचा बनॉर्ड ओगिंगाच्या फाऊलमुळे भारतीय टीमला फ्री किक मिळाली. अनिरूद्ध थापाची फ्री किक थेट कर्णधार सुनील छेत्रीजवळ पोहोचली. त्याने या फ्री किकचं गोलमध्ये रुपांतर करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर २९ व्या मिनिटाला छेत्रीने आणखी एक गोल करत भारताला दुसरी आघाडी मिळवून दिली.

टुर्नामेंटमध्ये भारत सुरुवापासूनच अव्वल

या टुर्नामेंटमध्ये भारताने सुरुवापासूनच उत्तम खेळाचं सादरीकरण केलं आहे. न्यूजीलंडविरूद्धच्या केवळ एकाच सामन्यात भारताने पराभवाचा सामना केला. पॉइंट टेबलमध्ये सर्वात वर असल्याने भारत पहिल्या दोन सामन्यांनंतरच फायनलमध्ये पोहोचला. यूएईत २०१९मध्ये होणाऱ्या आशियाई कपसाठी तयारीच्या हेतूने भारताने या टुर्नामेंटचे आयोजन केले होते.

मेस्सीच्या विक्रमाशी केली बरोबरी

कर्णधार सुनील छेत्रीने फुटबॉल जगातातील एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या आणि सध्या खेळत असलेल्या फुटबॉल खेळाडूंमध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले आहे. फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू आणि अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी याची बरोबरी करत छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ६४ गोलची नोंद केली आहे. या यादीत मेस्सी आणि छेत्री या दोन्ही दिग्गज फुटबॉलपटूंच्या नावावर प्रत्येकी ६४ गोलची नोंद झाली आहे. त्याशिवाय आतापर्यंत देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या एकूण क्रमवारीत मेस्सी आणि छेत्री संयुक्तपणे २१व्या स्थानी आहेत. तर त्यांच्यापुढे म्हणजेच अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याने १५० सामन्यांतून पोर्तुगालसाठी ८१ गोल केले आहेत. छेत्रीच्या या कामगिरीमुळे त्याला इंटरकॉन्टिनेंटल कप २०१८स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

सुनील छेत्रीची मेस्सीच्या विक्रमाशी बरोबरी
First Published on: June 11, 2018 6:47 AM
Exit mobile version