भारतातील बुकींनी क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार माजवलाय – आयसीसी

भारतातील बुकींनी क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार माजवलाय – आयसीसी

आयसीसी भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अॅलेक्स मार्शल

आयसीसीचे भ्रष्टाचार विरोधी विभागाचे प्रमुख अॅलेक्स मार्शल सध्या श्रीलंकेत सनथ जयसूर्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करत आहेत. यावेळी त्यांनी ESPN Cricinfo या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केलेला आहे. ते म्हणाले की, “श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. श्रीलंकेच्या स्थानिक नागरिकांशिवाय भारतीय बुकी देखील येथे सर्वात जास्त सक्रीय आहेत. जर जागतिक क्रिकेटचा विचार केला तर भारतीय बुकी हे सर्वात जास्त भ्रष्टाचारात गुंतले आहेत.”

काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या (ICC) भ्रष्टाचार विरोधी विभागाने एक पत्रक काढून श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जयसूर्याला १४ दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस दिली होती. मात्र त्यानंतर जयसुर्यावर सरळसोट भ्रष्टाचाराचे आरोप न करता अशा प्रकरणात चौकशीला सहकार्य करत नसल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याच प्रकरणाची चौकशी सध्या अॅलेक्स मार्शल करत आहेत.

भ्रष्टाचारामुळे युवा क्रिकेटरांचे नुकसान

अॅलेक्स पुढे म्हणाले की, श्रीलंका असा देश आहे की जिथे आम्ही मागच्या एक वर्षांपासून तपास करत आहोत. दुसऱ्या स्थानावर झिम्बाब्वे आहे. क्रिकेटमधील संघटीत भ्रष्टाचारावर आमची नजर आहे. भ्रष्टाचारामुळेच युवा क्रिकेट खेळांडूचे नुकसान होत असल्याची भावना अॅलेक्स यांनी व्यक्त केली. सध्या इंग्लड आणि श्रीलंका संघादरम्यान वन डे सीरीज खेळवली जात आहे. अॅलेक्स यांनी सांगितले की, सामने सुरु होण्यासाठी आम्ही दोन्ही संघाच्या खेळांडूशी चर्चा केली. जे संदिग्ध लोक आहेत, अशा लोकांचे फोटो त्यांना दाखवले. तसेच त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला, असेही अॅलेक्स म्हणालेत.

First Published on: October 19, 2018 10:33 AM
Exit mobile version