“तुम्ही देव नाही आहात; BCCI वर भारतीय चाहते भडकले, म्हणाले…

“तुम्ही देव नाही आहात; BCCI वर भारतीय चाहते भडकले, म्हणाले…

भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात टी २० विश्वकप खेळत आहे. त्यात भारतीय संघाला या मालिकेत दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे साहजिकच भारतीय संघाच्या खेळीबाबत सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जातोय. न्यूझीलंड सोबतच्या पराभवामुळे तर भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पोहचण्याचा मार्ग जवळपास संपुष्टात आला आहे. भारताची या सामन्यातील कामगिरी पाहून अनेक भारतीय चाहत्यांच्या मनात भारतीय संघाबद्दल नाराजी असल्याचे पहायला मिळते आहे. न्यूझीलंड विरूध्दच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक होता. पण पराभव झाल्याने आता भारतीय संघाच्या कामगिरीवर चहू बाजूंनी टीका होत आहे.

भारतीय चाहत्यांचे मत मांडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारतीय क्रिकेट बोर्डावर (BCCI) टिप्पणी करण्यात आली असून “तुम्ही देव नाही आहात हे लक्षात घ्या अशी टीका करण्यात आली आहे. तसेच खेळाडूंनाही टोला लगावत तुम्ही आयपीएल खेळत नसून देशासाठी खेळत आहात, याचे भान ठेवा असा सल्ला देण्यात आला.

न्यूझीलंड सोबतच्या सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे सर्वच चाहत्यांच्या मनात भारतीय संघाबद्दल निराशा आहे. त्या सामन्यानंतर मैदानाबाहेर काही चाहत्यांशी संपर्क केला असता एका भारतीय संघाच्या चाहत्याने कॅमेऱ्यासमोर आपली नाराजी उघड केली. हा व्हि़डीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “आजच्या पराभवातून काही शिकण्याची गरज आहे. खेळाडूंना जास्त अहंकार झाला की काय होते, याचे हे उदाहरण आहे. असे घडण्यामागील कारण म्हणजे बीसीसीआय आणि दुसरे म्हणजे आयपीएल. आपण देव नाही आहोत हे बीसीसीआयने लक्षात घ्यायला हवे. प्रत्यक्ष स्थिती पाहून खेळाडूंकडे लक्ष दिले पाहिजे. खेळाडूंनीही आपण आयपीएल खेळत नसून देशासाठी खेळत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असू शकता पण तुमच्या खेळीतून दिसणे अपेक्षित आहे.” असे हा चाहता व्हिडीओत सांगतो.

 


हे ही वाचा: Yuvraj singh: मी परत येतोय ! सिक्सर किंग युवराज सिंगची घोषणा


 

First Published on: November 2, 2021 5:12 PM
Exit mobile version