भारतीय हॉकी प्रशिक्षकांना पुरेसा वेळ मिळायला हवा – भास्करन

भारतीय हॉकी प्रशिक्षकांना पुरेसा वेळ मिळायला हवा – भास्करन

व्ही. भास्करन

भारताचे माजी कर्णधार, प्रशिक्षक आणि ऑलिम्पिक विजेते व्ही. भास्करन यांनी ‘भारतीय’ हॉकी प्रशिक्षकांबाबत सहानुभूती दर्शविताना सांगितले की भारतीय प्रशिक्षकांना पुरेसा अवधी द्यायला हवा. सध्याचे प्रशिक्षक हरेंद्र चांगली कामगिरी करत असून त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले असल्यामुळे संघाची कामगिरी चांगली होत आहे. भारतीय हॉकीचा ढाचा बदलायला हवा. नुसती वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करून फारसा उपयोग होणार नाही. युरोपीय देशांचा विचार करता भारतातील राष्ट्रीय हॉकी स्पर्धा कुचकामी ठरतात. भारताचा राष्ट्रीय संघ आणि इतर संघ (देशांतर्गत) यात फारच तफावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या दशकभरात हॉकीचा ढाचाच बदलला  

१९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भास्करन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले. पण तेव्हा जागतिक स्पर्धा आजच्याप्रमाणे फोफावल्या नव्हत्या. आमच्यानंतर काही खेळाडू उदयाला आले. परंतु २०००-२००८ नंतर हॉकीमध्ये विलक्षण बदल झाले. गेल्या दशकभरात हॉकीचा ढाचाच बदलला आहे असे ते म्हणाले.

हॉकीच्या प्रगतीसाठी देशांतर्गत स्पर्धांची संख्या वाढवा  

भारतात ओल्टमन्स, टेरी वॉल्शसारखे परदेशी प्रशिक्षक नेमण्यात आले. पण निकाल तर सर्वभूतच आहेत. परदेशी प्रशिक्षकांऐवजी भारतीय प्रशिक्षकांना संधी द्यायला हवी. देशात निवडणूका दरवर्षी होत नाहीत. त्याचा कालावधी निश्चित असतो. त्याचप्रमाणे प्रशिक्षकाला ठराविक मुदत द्यायला हवी, याचा भास्करन यांनी आवर्जून उल्लेख केला. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा वाढायला हवा. पंजाब, झारखंड, तामिळनाडू आणि बंगळुरू येथील हॉकीचा दर्जा बरा असून सुधारणेला वाव आहे. तसेच तिथे हॉकी बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. हॉकीच्या प्रगतीसाठी देशांतर्गत स्पर्धांची संख्या वाढायला हवी. तसेच शाळा, कॉलेज युवकांसाठी हॉकी स्पर्धा आयोजित करायला हव्यात. हॉलंडसारख्या हॉकीप्रिय देशात लहान मुलांच्या हातात हॉकी स्टिक देण्यात येते. आपल्याकडे काय देतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जागतिक हॉकी स्पर्धा आणि भारतातील हॉकी स्पर्धा यांच्यात बरीच तफावत असून जागतिक दर्जा गाठण्यासाठी सर्वांकष प्रयत्न करायला हवेत. असे झाले तरच भारतीय हॉकीचे भविष्य उज्ज्वल असेल असे त्यांनी नमूद केले.
First Published on: December 12, 2018 4:00 AM
Exit mobile version