Javelin Rankings : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला क्रमवारीत तब्बल १४ स्थानांची बढती

Javelin Rankings : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला क्रमवारीत तब्बल १४ स्थानांची बढती

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रासाठी मागील काही दिवस अविस्मरणीय ठरले आहेत. नीरजने मागील शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलावहिला भारतीय खेळाडू ठरला. या कामगिरीचा त्याला भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीतही फायदा झाला आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, नीरजला तब्बल १४ स्थानांची बढती मिळाली असून त्याने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीत जर्मनीचा योहानेस वेट्टर अव्वल स्थानी आहे. त्याच्या खात्यात सर्वाधिक १३९६ गुण असून दुसऱ्या स्थानावरील नीरजचे १३१५ गुण आहेत.

सर्वोत्तम दहा क्षणांमध्ये नीरजची कामगिरी

२३ वर्षीय नीरजने टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. याच फेरीत वेट्टरला अव्वल आठ खेळाडूंमध्येही प्रवेश मिळवता आला नव्हता. टोकियो ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांतील सर्वोत्तम दहा क्षणांमध्ये नीरजच्या सुवर्ण कामगिरीचा समावेश होता. ‘खेळांच्या चाहत्यांनी ऑलिम्पिक स्पर्धांपूर्वी नीरज चोप्राचे नाव ऐकले होते. परंतु, टोकियोमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याने आणि ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरल्याने चोप्रा खूपच लोकप्रिय झाला आहे,’ असे जागतिक अ‍ॅथलेटिक्सने सांगितले होते.

इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढले

नीरजला यंदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने उत्कृष्ट कामगिरी करताना पात्रता फेरी आणि अंतिम फेरी या दोन्हीत अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीमुळे नीरजने जगभरात असंख्य चाहते मिळवले आहेत. ऑलिम्पिकपूर्वी इंस्टाग्रामवर नीरजचे १ लाख ४३ हजार फॉलोअर्स होते. तर ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीनंतर आता तब्बल ३.२ मिलियन (३२ लाख) लोक फॉलो करत आहेत.

First Published on: August 12, 2021 3:03 PM
Exit mobile version