भारताचा न्यूझीलंडवर ३-१ ने विजय, मालिकाही घातली खिशात

भारताचा न्यूझीलंडवर ३-१ ने विजय, मालिकाही घातली खिशात

भारतविरूद्ध न्यूझीलंड सामन्यांतील एक चुरशीचा क्षण

भारतीय पुरूष हॉकी संघाने आपले सातत्यापूर्ण प्रदर्शन कायम ठेवत न्यूझीलंड पुरूष हॉकी संघाला दुसऱ्या सामन्यात ३-१ ने पराभूत करत ३ सामन्यांच्या मालिकेत अप्रतिम विजय मिळवला आहे. भारत आणि न्यूझीलंड पुरूष संघांत ३ सामन्यांची मालिका बंगळुरु येथील स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या मैदानावर खेळवली जात आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना ४-२ च्या फरकाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना ३-१ च्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत २-० ची विजयी आघाडी मिळवली आहे.


भारताकडून रुपिंदरपाल सिंहने १८ व्या मिनीटाला मिळालेल्या पेनल्टीच्या संधीचे गोलमध्ये रूपांतर भारताला सामन्यात पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडकरून २४ व्या मिनीटाला स्टिफन जेनीसने गोल करत न्यूझीलंडला सामन्यात बरोबरी साधून दिली. मात्र भारताने ही बरोबरी तोडत २७ व्या मिनीटाला एस. व्ही. सुनीलने गोल करत भारताला सामन्यात २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या काही मिनीटात मनदीप सिंहने गोल करत भारताचा विजय पक्का केला. सुरूवातीपासूनच भारताच्या बाजूने झुकलेल्या सामन्यात भारताने अखेर ३-१ ने विजय मिळवत मालिकाही २-० च्या फरकाने जिंकली.

पहिल्या सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंह याने २ तर मनदीप सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी एक एक गोल केले होते तर दुसऱ्या सामन्यात रुपिंदरपाल सिंह, एस. व्ही. सुनील आणि मनदीप सिंह या प्रत्येकांनी एक एक गोल केला असून या मालिकेत रुपिंदरपाल सिंहने सर्वाधिक ३ गोल केले आहेत.

First Published on: July 22, 2018 1:22 PM
Exit mobile version