आयपीएल करारांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कोहलीसमोर नमते घेतले!

आयपीएल करारांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कोहलीसमोर नमते घेतले!

मायकल क्लार्कचे विधान

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेमुळे खेळाडूंना अवघे दोन महिने दर्जेदार क्रिकेट खेळून बरेच पैसे मिळवण्याची संधी मिळते. त्यामुळे स्थानिक, आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडू या स्पर्धेत खेळण्यास उत्सुक असतात. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्लेजिंगसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, आयपीएल करार वाचवण्यासाठी मधल्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या सहकार्‍यांसमोर नमते घेतले, असा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने एका मुलाखतीत केला. तो २०१८ मधील बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतरच्या काळाविषयी बोलत होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा स्थानिक पातळीवर आयपीएल स्पर्धा, क्रिकेटमध्ये पैशाचा विषय येतो तेव्हा भारत किती मोठा आहे हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच मागील काही काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि इतरही संघ भारतासमोर नमते घेतात. इतर संघांचे खेळाडू कोहली किंवा कोणत्याही भारतीय खेळाडूला स्लेजिंग करायला घाबरायचे, कारण त्यांना भारतीय खेळाडूंसोबतच एप्रिलमध्ये (आयपीएल) खेळायचे असते, असे क्लार्क म्हणाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी नसले तरी या दोन संघांमध्ये अनेक अविस्मरणीय सामने झाले आहेत. या सामन्यांत दोन्ही संघांचे खेळाडू आक्रमकपणे खेळतात. मात्र, आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची आक्रमकता कमी झाली आहे, असेही क्लार्कला वाटते. आयपीएल फ्रेंचायझीस ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या संघात घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळे खेळाडू भारताविरुद्ध खेळताना विचार करतात की, “मी कोहलीला स्लेजिंग करणार नाही, जेणेकरून तो मला बंगळुरूच्या संघात निवडेल आणि सहा आठवड्यांत मला खूप पैसे मिळतील”. या विचारामुळेच मधल्या काही काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट नरमले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये आता पूर्वीसारखा आक्रमकपणा राहिलेला नाही, असे क्लार्कने नमूद केले.

सचिन तांत्रिकदृष्ट्या सर्वात परिपूर्ण!

मी अनेक अप्रतिम फलंदाजांविरुद्ध खेळलो, पण भारताचा सचिन तेंडुलकर तांत्रिकदृष्ट्या सर्वात परिपूर्ण फलंदाज होता, असे मायकल क्लार्क म्हणाला. तसेच सचिन इतका उत्कृष्ट फलंदाज होता की, तो कधी चूक करतो याची ऑस्ट्रेलियन संघ वाट पाहायचा असेही क्लार्क म्हणाला. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणार्‍या सचिनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने, धावा, शतके असे असंख्य विक्रम आहेत.

First Published on: April 8, 2020 5:27 AM
Exit mobile version