ICC Test Rankings : भारत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर; न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण

ICC Test Rankings : भारत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर; न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण

न्यूझीलंडविरूध्दच्या दुसऱ्या कसोटी मालिकेत मिळवलेल्या मोठ्या विजयासह भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत चांगली मुसंडी मारली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदात भारतीय संघ पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ बनला आहे. यापूर्वी पहिल्या स्थानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा गतविजेता न्यूझीलंडचा संघ विराजमान होता. मात्र २०१९-२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाची आता पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. भारतीय संघाकडे १२४ रेटिंग झाली आहे तर न्यूझीलंडच्या संघाकडे १२१ रेटिंग आहे. ३ रेटिंगच्या अंतराने भारताने न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण केली. दरम्यान भारताकडे २८ सामन्यांत ३४४५ गुण आहेत तर दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडकडे ३०२१ गुण आहेत.

दरम्यान, १०८ रेटिंगनुसार ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर १०७ रेटिंगनुसार इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या स्थानावर शेजारील देश पाकिस्तानची वर्णी लागली आहे. भारतीय संघाने सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने दुसऱ्या सामन्यात ३७२ धावांनी विजय मिळवला सोबतच २ सामन्यांच्या मालिकेवर देखील कब्जा केला. कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

यापूर्वी भारतीय संघाने दुसरा मोठा विजय २००७ मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव केला होता. तर २०१६ मध्ये भारताने इंदौर कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ३२१ धावांनी पराभूत केले होते. लक्षणीय बाब म्हणजे जागतिक पातळीवर या विक्रमाची नोंद इंग्लंडच्या संघाच्या नावावर आहे. १९९८ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये झालेल्या सामन्यात ६७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते.


हे ही वाचा: http://IND vs NZ 2nd Test : १४ बळी घेणारा एजाज पटेल नाही बनला सामनावीर; सोशल मीडियावर चिघळला नवा वाद


 

First Published on: December 6, 2021 3:17 PM
Exit mobile version