Ind vs SA Women : झुलनचा भेदक मारा; भारताची मालिकेत बरोबरी

Ind vs SA Women : झुलनचा भेदक मारा; भारताची मालिकेत बरोबरी

भारतीय महिला क्रिकेट संघ

झुलन गोस्वामीचा भेदक मारा, तसेच स्मृती मानधना आणि पुनम राऊत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट राखून विजय मिळवला. हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने पहिला सामना गमावला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांनी दमदार पुनरागमन केले. भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत ४२ धावांत ४ विकेट मिळवल्या.

झुलनच्या ४ विकेट

या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची २ बाद २० अशी अवस्था होती. परंतु, कर्णधार सुने लस (३६) आणि लारा गुडॉल (४९) यांनी ६० धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. मात्र, मानसी जोशीने लसला माघारी पाठवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाज चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव १५७ धावांवर संपुष्टात आला. भारताच्या झुलनने ४ विकेट, तर राजेश्वरी गायकवाडने ३ विकेट घेतल्या.

१३८ धावांची अभेद्य भागीदारी

१५८ धावांचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्स केवळ ९ धावा करून बाद झाली. यानंतर मात्र मानधना (नाबाद ८०) आणि पुनम राऊत (नाबाद ६२) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघींनी १३८ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. भारताने १५८ धावांचे लक्ष्य २८.४ षटकांत गाठले.

First Published on: March 9, 2021 8:47 PM
Exit mobile version