सुनील छेत्रीने टाकले मेस्सीला मागे; अव्वल दहामध्ये प्रवेश करण्यापासून एक गोल दूर

सुनील छेत्रीने टाकले मेस्सीला मागे; अव्वल दहामध्ये प्रवेश करण्यापासून एक गोल दूर

सुनील छेत्रीने टाकले लिओनेल मेस्सीला मागे

भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. सोमवारी भारताने २०२२ फिफा वर्ल्डकप आणि २०२३ आशिया चषक स्पर्धेच्या संयुक्त पात्रता फेरीच्या सामन्यात बांगलादेशवर २-० अशी मात केली. फिफा वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत हा भारताचा सहा वर्षांत पहिला विजय ठरला. या सामन्यात भारताचे दोन्ही गोल ३६ वर्षीय छेत्रीने केले. बांगलादेशविरुद्ध केलेल्या दोन गोलमुळे छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपली गोलसंख्या ७४ वर नेली.

रोनाल्डो अव्वल स्थानी

या कामगिरीसह छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले. या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो अव्वल स्थानी असून त्याने आतापर्यंत १०३ गोल केले आहेत. या यादीत छेत्रीने (७४ गोल) आता दुसरे स्थान पटकावले असून युएईचा अली माबखोत (७३ गोल) तिसऱ्या स्थानी आहे. मेस्सीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत ७२ गोल केले असून त्याने मागील शनिवारी चिलीविरुद्धच्या वर्ल्डकप पात्रता स्पर्धेच्या सामन्यात गोल केला होता.

अव्वल दहापासून एक गोल दूर 

आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या अव्वल १० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी छेत्रीला केवळ आणखी एका गोलची आवश्यकता आहे. हंगेरीचा सँडोर कॉक्सीस, जपानचा कुनिशिगे कामामोटो आणि कुवेतचा बशर अब्दुलाह हे माजी खेळाडू संयुक्तरित्या दहाव्या स्थानावर असून त्यांच्या नावे प्रत्येकी ७५ गोल आहेत.

First Published on: June 8, 2021 5:35 PM
Exit mobile version