लक्ष्य दमदार पुनरागमनाचे!

लक्ष्य दमदार पुनरागमनाचे!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी ऑकलंडला होणार आहे. सलामीच्या सामन्यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका सुधारून दमदार पुनरागमन करण्याचे विराट कोहलीच्या भारतीय संघाचे लक्ष्य असेल. टी-२० मालिकेत न्यूझीलंडला ५-० असा व्हाईटवॉश दिल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, याचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांना फारसा फायदा झाला नाही. हा सामना न्यूझीलंडने चार विकेट राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. त्यामुळे ही मालिका गमवायची नसल्यास भारताला दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे अनिवार्य आहे.

हॅमिल्टनला झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने विक्रमी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर उभारला, पण गोलंदाजांची निराशजनक कामगिरी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे त्यांनी हा सामना गमावला. अनुभवी रॉस टेलरने केलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने ३४९ धावांचे लक्ष्य ११ चेंडू राखूनच पूर्ण केले. मात्र, एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गमावणे भारतासाठी नवीन नाही. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्या. या दोन्ही मालिकांमधील पहिल्या सामन्यात भारत पराभूत झाला, पण त्यांनी पुनरागमन करत या मालिका जिंकल्या. आता न्यूझीलंडविरुद्धही अशीच कामगिरी करण्यास विराट कोहलीचा संघ उत्सुक असेल.

पहिल्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने आपले एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले. त्याला कर्णधार कोहली आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतके करत उत्तम साथ दिली. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात फलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमी आहे. गोलंदाजीत मात्र शार्दूल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळू शकेल. शार्दूलने पहिल्या सामन्यात १ गडी बाद केले, पण त्यासाठी त्याने ८० धावा खर्ची केल्या. तसेच लेगस्पिनर युजवेंद्र चहलचा संघात समावेश करण्याबाबतही भारत विचार करु शकेल.

दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ या सामन्यात आत्मविश्वासानिशी मैदानात उतरले. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टेलर, कर्णधार टॉम लेथम आणि हेन्री निकोल्स या फलंदाजांनी आपला खेळ उंचावत पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. आता ऑकलंडला होणारा दुसरा सामना जिंकत ही मालिका जिंकण्याचा न्यूझीलंडचा नक्कीच प्रयत्न असले.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी.

न्यूझीलंड : टॉम लेथम (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम, जिमी निशम, स्कॉट कुगलायन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, हमिश बॅनेट, टीम साऊथी, कायेल जेमिसन, मार्क चॅम्पमन.

सामन्याची वेळ – सकाळी ७.३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

First Published on: February 8, 2020 5:02 AM
Exit mobile version