IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडू अखेर मायदेशी परतले; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआयचे आभार

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडू अखेर मायदेशी परतले; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआयचे आभार

आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू अखेर मायदेशी परतले

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि समालोचक अखेर मायदेशी परतले आहेत. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने यंदा आयपीएल स्पर्धा ४ मे रोजी स्थगित करण्यात आली होती. परंतु, ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातल्याने आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन व्यक्ती अडचणीत सापडल्या होत्या. बीसीसीआयने त्यांना ६ मे रोजी भारतातून मालदीवला पाठवण्याची व्यवस्था केली होती. अखेर ऑस्ट्रेलियातील हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि समालोचक असे एकूण ३८ लोक आपल्या मायदेशी परतले. त्यांना मायदेशी सुखरूप पोहोचवल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयचे आभार मानले.

मायदेशी परतल्याबद्दल खुश

आमचे सर्व खेळाडू मायदेशी दाखल झाल्याचा आम्हाला आनंद आहे. बीसीसीआयने त्यांना इतक्या लवकर आणि सुखरूप घरी पोहोचवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतल्यानंतर माझी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. परंतु, मी त्यांना मेसेज केला असून मायदेशी परतल्याबद्दल ते खुश आहेत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली म्हणाले.

सिडनीत १४ दिवस क्वारंटाईन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि समालोचकांना आता सिडनी येथील हॉटेल्समध्ये १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यानंतर ते आपापल्या घरी परत जाऊ शकतील. चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीसुद्धा दोहा येथून ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. कोरोनाची बाधा झाल्याने हसीला मालदीवला जाता आले नव्हते. परंतु, आता तो कोरोनामुक्त झाल्याने मायदेशी परत जाऊ शकला आहे.

First Published on: May 17, 2021 9:35 PM
Exit mobile version