IPL 2021 : यंदा आयोजनात बीसीसीआयने केल्या बऱ्याच चुका! ग्राऊंड स्टाफला बायो-बबल नाही

IPL 2021 : यंदा आयोजनात बीसीसीआयने केल्या बऱ्याच चुका! ग्राऊंड स्टाफला बायो-बबल नाही

यंदा आयपीएलच्या आयोजनात बीसीसीआयने केल्या बऱ्याच चुका; ग्राऊंड स्टाफला बायो-बबल नाही 

भारतामध्ये मागील वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा मागील मोसम युएईमध्ये खेळवण्यात आला. या स्पर्धेत सर्व नियमांचे पालन झाल्याने मागील मोसम यशस्वीरीत्या पार पडला. यंदा भारतामध्ये कोरोनाचा धोका कायम असून युएईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, असे असतानाही बीसीसीआयने यंदा आयपीएलचे आयोजन भारतात केले. त्यातच त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनात बऱ्याच चुकाही केल्याचे समजते. बीसीसीआयने बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित असावे यासाठी बराच खर्च केला. परंतु, कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केलाच. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि ग्राऊंड स्टाफचे सदस्य यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयला यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले.

ग्राऊंड स्टाफला बायो-बबल नाही

सर्वच संघांना सराव करताना ग्राऊंड स्टाफची मदत लागते. सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या तयार कराव्या लागतात, त्यांच्यावर पाणी मारावे लागते. त्यामुळे ग्राऊंड स्टाफच्या सदस्यांनीही बायो-बबलमध्येच राहणे गरजेचे होते. मात्र, मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी ग्राऊंड स्टाफला बायो-बबलमध्ये ठेवण्यात आले नाही. परिणामी, यापैकी बऱ्याच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

जीपीएस उपकरणात तांत्रिक बिघाड

तसेच सामने केवळ एकाच मैदानावर व्हावेत असे बऱ्याच संघांना वाटत होते. मात्र, बीसीसीआयने त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच खेळाडू कुठे जात आहेत, यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना जीपीएस देण्यात आले होते. मात्र, त्यातही तांत्रिक अडचणी होत्या असे समजते. तसेच हॉटेलही पूर्णपणे सुरक्षित नव्हते. त्यामुळे यंदा बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनात बऱ्याच चुका केल्याचे दिसून आले आहे.

 

First Published on: May 4, 2021 8:48 PM
Exit mobile version