IPL 2021 : बीसीसीआयचा हट्ट पडला महागात; गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला दिला होता नकार

IPL 2021 : बीसीसीआयचा हट्ट पडला महागात; गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला दिला होता नकार

आयपीएलचे उर्वरित सामने युएईत खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय 

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा भारतात आयोजित केली. त्यामुळे पुढे जाऊन ही स्पर्धा रद्द किंवा स्थगित करावी लागू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये सुरु होती. मात्र, या बायो-बबलमध्येही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. परंतु, बीसीसीआयने हट्टाहास न करता, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असती, तर हा सर्व प्रकार टाळता आला असता.

यंदाही आयपीएल युएईमध्ये घेण्याचा प्रस्ताव

यंदा आयपीएल स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली. मात्र, त्याच्या एक आठवडा आधीच गव्हर्निंग कौन्सिलने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आयपीएल युएईमध्ये घेण्याचा प्रस्ताव बीसीसीआयपुढे ठेवला होता. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती चिंताजनक होऊ शकेल अशी भीती आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी बीसीसीआयपुढे व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला नकार दिला आणि यंदाचा आयपीएल मोसम भारतात आयोजित केला.

युएईमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात

यंदाही आयपीएल युएईमध्ये व्हावे असे गव्हर्निंग कौन्सिलला वाटत होते. यंदाची स्पर्धा सुरु होण्याच्या एक आठवडा आधी त्यांनी बीसीसीआयपुढे तसा प्रस्तावही ठेवला होता. अमिराती क्रिकेट बोर्डसुद्धा आयपीएलच्या आयोजनासाठी तयार होते. मात्र, इतक्या कमी कालावधीत संपूर्ण स्पर्धा युएईत हलवणे शक्य नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. त्यांनी गव्हर्निंग कौन्सिलच्या प्रस्तावाला नकार दिला, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. युएईमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. ३ मार्च रोजी (काल) भारतात ३ लाख ६८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते, त्याचवेळी युएईमध्ये १ हजार ७७२ जणांनाच कोरोनाची बाधा झाली होती.

First Published on: May 4, 2021 5:05 PM
Exit mobile version