IPL 2021 : वोक्स म्हणतो, यंदा आयपीएलमध्ये खेळणारे सर्व खेळाडू नशीबवान, कारण…

IPL 2021 : वोक्स म्हणतो, यंदा आयपीएलमध्ये खेळणारे सर्व खेळाडू नशीबवान, कारण…

दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू क्रिस वोक्स

भारतासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. भारतात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण खूप वाढला आहे. ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही लॉकडाऊन करणे भाग पडले आहे. एका बाजूला अशी परिस्थिती असताना दुसरीकडे भारतातच जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांविना होत आहेत. तसेच खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागत आहे. त्यांना हॉटेलमधून बाहेर पडून फिरण्याची परवानगी नाही. हे निर्बंध थोडे अवघड असले, तर कोरोना काळात आम्हाला आयपीएल खेळायला मिळणे हे आमचे भाग्य असल्याचे दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू क्रिस वोक्स म्हणाला.

लोकांचे मनोरंजन करण्याची संधी

सध्याची परिस्थिती खूप अवघड आहे. जगभरातील लोकांना कोरोनाचा सामना करावा लागत आहे. आम्हाला बायो-बबलमध्ये राहावे लागत आहे. मात्र, आम्ही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व खेळाडू नशीबवान आहोत, कारण कोरोनाच्या काळातही आम्हाला आयपीएलमध्ये खेळण्याची आणि लोकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळत आहे, असे वोक्सने सांगितले.

यंदाचे आयपीएल वेगळे

सध्याच्या परिस्थिती खूपच वेगळी आहे. यंदाचे आयपीएलही वेगळे आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षक नाहीत, आम्हाला बायो-बबलमध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे, असेही वोक्स म्हणाला. आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू बायो-बबलमध्ये राहत असले तरी काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.

 

First Published on: April 23, 2021 4:21 PM
Exit mobile version