IPL 2021 : ‘सामना गमावला तरी मनं जिंकलीस!’ क्रिकेटपटूंकडून सॅमसनचे कौतुक

IPL 2021 : ‘सामना गमावला तरी मनं जिंकलीस!’ क्रिकेटपटूंकडून सॅमसनचे कौतुक

संजू सॅमसन

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात राजस्थानचा संघ ४ धावांनी पराभूत झाला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात ६३ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावांची खेळी केली. मात्र, त्याला इतरांची फारशी साथ न लाभल्याने राजस्थानने हा सामना गमावला. परंतु, सॅमसनने केलेल्या खेळीचे आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले. चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी सुरेश रैनानेही सॅमसनची स्तुती केली. ‘संजू सॅमसनने उत्कृष्ट खेळी केली. तू तुझ्या खेळीने अनेकांची मनं जिंकलीस. असाच खेळत राहा,’ असे रैनाने ट्विट केले.

राजस्थानला सामना जिंकता आला नाही

तसेच मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही सॅमसनचे त्याच्या खेळीबद्दल अभिनंदन केले. ‘सॅमसनसाठी खूप आनंद झाला. त्याने उत्कृष्ट खेळी केली. टॉप क्लास,’ असे बुमराह त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. व्ही. व्ही. लक्ष्मणनेही सॅमसनचे कौतुक केले. मात्र, सॅमसनच्या उत्कृष्ट खेळीनंतरही राजस्थानला हा सामना जिंकता आला नाही. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २२१ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना राजस्थानने २० षटकांत ७ बाद २१७ धावा केल्याने त्यांना विजयासाठी ४ धावा कमी पडल्या.

First Published on: April 13, 2021 4:27 PM
Exit mobile version